महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. आपल्याबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पण, तिघांमध्ये भाजपा हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे मोठ्या भावाला त्यागही करावा लागतो. मोठ्या भावाला दोन्ही भावांना सांभाळून घ्यावं लागतं. ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
राज्यातील पदाधिकारी आणि जिल्ह्याध्यक्षांना देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत संबोधित केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे सरकार तीन पक्षांचं असलं, तरी भाजपा आपल्या ध्येयधोरणापासून हटणार नाही. भाजपा ध्येय आणि धोरणावर काम करत राहिल. दोन्ही मित्रपक्षांना बरोबर घेऊन निश्चितपणे काम करणार आहोत.
“२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण ४० च्या वरती जागा मिळवल्या होत्या. यंदाच्याही निवडणुकीत मेहनत केली, तर सर्व रेकॉर्ड तोडू शकतो,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : “एक अफवा सकाळी सोडायची, दुसरी अफवा संध्याकाळी सोडायची”; फडणवीसांचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
“निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं, हा आपला संकल्प आहे. मोदींना पंतप्रधान बनवणे हे भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी महत्वाचे आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.