२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बंगळुरू येथे पार पडलेल्या दुसऱ्या बैठकीत विरोधी पक्षाच्या आघाडीचं नामकरण ‘INDIA’ असं करण्यात आलं आहे. INDIA नामकरण करण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या आघाडीची तुलना दहशतवादी संघटना ‘इंडियन मुजाहिदीन’शी तुलना केली.
देशातील विरोधी पक्षाची तुलना दहशतवादी संघटनेशी केल्यानं विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून भाजपावर टीकेची झोड उठवली. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ‘इंडिया’नावावरून भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नसलेल्या आरएसएसच्या (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) कुशीत भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला, अशी टीका नाना पटोलेंनी केली. आरएसएसने कधीही तिरंगा फडकवला नाही, असंही ते म्हणाले. जालना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं.
हेही वाचा- भर बैठकीत अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा; थेट अंगावर गेले धावून, नेमकं कारण काय?
‘INDIA’ नावाला भाजपाकडून होत असलेल्या विरोधावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, “इंडिया, हे नाव घेण्यासाठी यांना (भाजपा) लाज का वाटते? भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं योगदान नाही, ज्यांनी कधीही तिरंगा फडकवला नाही, अशा आरएसएसच्या कुशीत भाजपाचा जन्म झाला आहे. यांना भारताचं आणि इंडियाचं नाव घेतल्यावर एवढं का दुखायला लागलं. ‘इंडिया विरुद्ध एनडीए’चा भारतीय जनता पार्टीला त्रास होत आहे. म्हणून त्यांच्या लोकांनी नेहमी भारताचा आणि इंडियाचा द्वेष केला आहे. त्यामुळे त्यांना आताही त्रास होत आहे.”