जालना लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुनील आर्दड यांना उभे करण्याचे प्रयत्न आहेत. आर्दड पूर्वाश्रमीचे भाजप परिवारातील आहेत.
मनसेचे जिल्ह्य़ातील नेते सुदामराव सदाशिवे यांनी ‘लोकसत्ता’स सांगितले, जालना लोकसभा मतदारसंघात सुनील आर्दड यांनी उभे राहावे, यासाठी मुंबईत आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. या मतदारसंघात आर्दड यांची उमेदवारी पक्षासाठी अनुकूल ठरणार असून त्यांच्या नावाची घोषणा होण्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत.
आर्दड मूळ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असून डिसेंबर २०११ मध्ये त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राजकीय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार बबनराव लोणीकर यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून भाजपमध्ये ते लोणीकर यांचे निकटवर्ती होते. त्याचप्रमाणे भाजपचे औरंगाबाद जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्याशीही त्यांची जवळीक राहिलेली आहे. आपल्या व्यवसायासाठी देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केल्याबद्दल आर्दड यांनी यापूर्वीच हरिभाऊ बागडे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी ते तीन वर्षे राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जालना शहर अध्यक्षपदीही ते होते. भाजपच्या तिकिटावर जालना नगरपरिषदेच्या सदस्यपदीही ते निवडून आले होते. नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपद आणि काही काळ जालना नगरपरिषदेचे प्रभारी अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आर्दड यांची उमेदवारी ‘मनसे’कडून जाहीर झाली तर निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
सुनील आर्दड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आपण सध्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत असून दोन दिवसांत जालना लोकसभेचा पक्षाचा उमेदवार जाहीर होईल. आपणास उमेदवारी जाहीर झाली तर लगेच प्रचारास प्रारंभ करणार आहोत. पूर्वाश्रमीचे भाजपचे असल्याने त्या पक्षात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही आपले अतिशय चांगले संबंध आहेत. याशिवाय ‘मनसे’त प्रवेश केल्यावर अन्य पक्षातील अनेक मान्यवरांचाही आपण लोकसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. आपली उमेदवारी निश्चित आहे का, असा थेट प्रश्न विचारला असता दोन दिवसांत पक्षाचा जो निर्णय जाहीर होणार आहे, त्याकडे पहा. तो निर्णय आपणास मान्य असेल. भाजपचा त्याग केला असला तरी बबनराव लोणीकर व हरिभाऊ बागडे यांच्याशी आजही आपले वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध आहेत, असेही आर्दड म्हणाले.

Story img Loader