सोलापूर : मागील दहा वर्षात सोलापुरात भाजपच्या दोन्ही खासदारांनी भरीव विकास केला आहे. विकासकामांची माहिती देताना दिवससुध्दा कमी पडेल, असा दावा करीत सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांनी, आम्ही मागील दहा वर्षांचा विकासकामांचा हिशेब तयार आहे, सत्तेच्या खुर्च्या उबविणाऱ्या तुमच्या ज्येष्ठ नेत्यांनी ७५ वर्षात सोलापूरसाठी काय केले हे सांगावे, असे आव्हान दिले आहे.
हेही वाचा >>> “आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
दक्षिण सोलापूर तालुक्याचा भाजप मेळावा शांतीसागर मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी बोलताना आमदार सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष्य बनविले. सोलापूर शहराभोवती उभारलेला बाह्यवळण रस्ता, आसपासच्या छोट्या-मोठ्या शहरांना जोडलेले चौपदरी रस्ते, गरीब कामगारांसाठी ३० हजार घरे, शेतक-यांना वार्षिक सहा हजार पेन्शन, अडीच लाख तरूणांना मुद्रा लोनच्या माध्यमातून १७०० कोटींचे कर्ज, उज्ज्वला गॕस अशी एक ना अनेक विकास कामे सोलापूरच्या यापूर्वीच्या दोन्ही भाजप खासदारांनी केली आहेत. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव आपल्याच सरकारने दिले आहे. अशी किमान २५० विकास कामे भाजपने केल्याचे सांगताना दिवसदेखील पुरणार नाही, असा दावा आमदार सातपुते यांनी केला. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वावर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. यापूर्वी ७०-७५ वर्षे काँग्रेसची सत्ता असताना आणि सोलापूरचे नेतृत्व करताना सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक सत्तापदे सांभाळली तरी त्यांनी सोलापूरचा कोणता विकास केला, याचा हिशेब देण्याचे आव्हान सातपुते यांनी दिले.