सांगली : विधानसभा निवडणुकीमध्ये शिराळा व वाळवा मतदार संघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल, इस्लामपूर, आष्टा नगरपालिकेत प्रसंगी तिसरी आघाडी करून निवडणूक लढविण्याबाबत विचार केला जाईल, कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीत राहावे असे मत नूतन आमदार सदाभाऊ खोत यांनी रविवारी व्यक्त केले.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आ. खोत यांचे सांगली जिल्ह्यात आगमन होताच, पेठनाका येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी वनश्री नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलामध्ये जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्वरूपराव पाटील, दि. बा. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील, माजी सभापती जगन्नाथ माळी, निजाम मुलानी, माजी नगरसेवक सतिश महाडीक, चेतन शिंदे, भाजपा पश्चिम मंडलचे अध्यक्ष डॉ.सचिन पाटील, युवा नेते सागर खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आ. खोत म्हणाले, इस्लामपूर नगरपालिकेत विचारांशी गद्दारी करणार्यांना पुन्हा निवडून द्यायचे नाही. वाळवा व शिराळा या दोन मतदार संघातील विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी मी प्रयत्नशील राहीन. जिल्हा बॅकेचे संचालक महाडिक म्हणाले, आ. खोत यांच्या नेतृत्वाखाली शिराळा व वाळवा मतदार संघाची निवडणूक ताकदीने लढवली जाईल, आ. खोत दुसर्यांदा आमदारकी मिळाल्याच्या संधीचा वापर कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी करतील असा विश्वास वाटतो.