रवींद्र जुनारकर, चंद्रपूर
एकीकडे भौतिक विकासाला प्राधान्य देणे त्यासोबतच वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योग, दारूबंदी, रस्ते, वीज, पाणी या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे तथा स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी व उमेदवारांविषयी व्यक्तिगत नाराजी, लोकसभा निवडणुकीनंतर जन्माला आलेली गटबाजी आणि मतदारांना गृहीत धरल्यामुळे या जिल्हय़ात पाच हजार कोटींची विकास कामे केल्यानंतरही भाजपाचा दारुण पराभव झाला तर संघटनात्मक पातळीवर पक्ष विस्कळीत असतानाही केवळ नेत्यांच्या बळावर काँग्रेसला तीन जागा जिंकण्यात यश आले.
२०१४ मध्ये सहापैकी पाच जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजप-शिवसेना युतीला विधानसभा निवडणुकीत बल्लारपुरात सुधीर मुनगंटीवार तर चिमुरात कीर्तीकुमार भांगडिया अशा केवळ दोन जागा जिंकता आल्या आणि तीन जागांवर युतीचा पराभव झाला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी पाच वर्षांत पाच हजार कोटींपेक्षा अधिकची विकास कामे येथे केली.
वैद्यकीय महाविद्यालयापासून तर सैनिक शाळा, वन अकादमी, बॉटनिकल गार्डन, पूल, बगिचे अशी असंख्य कामे अल्पावधीत पूर्ण केली. मात्र भौतिक विकास साधताना मुनगंटीवारांचे बेरोजगारी, उद्योग, शिक्षण, वीज, रस्ते, पाणी तसेच दारूबंदी आणि गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेनंतर निर्माण झालेले विद्यार्थ्यांचे मूलभूत प्रश्न याकडे दुर्लक्ष झाले. त्यातूनच या जिल्हय़ात भाजपा- शिवसेना विरोधात एक सुप्त लाट निर्माण झाली. त्याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालात बघायला मिळाला.
दारूबंदीमुळे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याविषयी एका विशिष्ट मतदार वर्गात नाराजीची भावना आहे. त्यातच चंद्रपूर व राजुराचे भाजप उमेदवार नाना शामकुळे व अॅड.संजय धोटे यांच्याविषयी मतदारांमध्ये व्यक्तिगत राग होता. नागपूरकर शामकुळे दहा वर्षांत चंद्रपूरकरांमध्ये मिसळलेच नाही. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी होतीच. तसेच भाजपचा कट्टर संघीय मतदारांना शामकुळे नकोच होते. त्यामुळे चंद्रपुरातील ही सर्व नाराज मते अपक्ष किशोर जोरगेवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली.
भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी महापौर, सभापती तथा नगरसेवकांवरही लोकांची तीव्र नाराजी होतीच. ही नाराजी मतदारांनी वेळोवेळी समाज माध्यमांवर व्यक्तही केली. परंतु भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यातून धडे घेण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले. राजुरात अॅड. संजय धोटे यांचा एकूणच कारभार अतिशय संथ होता. तसेच त्यांचे संपूर्ण कामकाज त्यांच्या भावाच्या भोवती एकरूप झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेत शिवसेना व रिपाइंला मंचापासून दूर ठेवणेही त्यांना महागात पडले. बल्लारपूर व चिमुरात सुधीर मुनगंटीवार आणि कीर्तीकुमार भांगडीया यांनी व्यक्तिगत पातळीवर सलग पाच वर्षे परिश्रम घेऊन स्वत: निवडून आले. परंतु ही किमया शामकुळे व अॅड. धोटे यांना साधता आली नाही.
वरोरा व ब्रम्हपुरीत संजय देवतळे व संदीप गड्डमवार यांनी केवळ आमदारकीसाठी भाजप व राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाणे मतदारांना पसंत पडले नाही. त्यामुळे मतदारांनी त्यांना झिडकारले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर या निवडणुकीत केवळ शरीराने भाजपच्या मंचावर दिसले. त्यांच्या समर्थकांनी कुणाचे हात मजबूत केले हे सर्वश्रूत आहे. काँग्रेसचा विजय हा काँग्रेसचा नाही तर नेत्यांचा व्यक्तिगत विजय आहे.
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार स्वत:साठी, वरोरात खासदार बाळू धानोरकर यांनी पत्नी प्रतिभा यांच्यासाठी तर राजुरा येथे सुभाष धोटे यांनी परिश्रम घेतले. त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तशी साथ दिली. त्यामुळे तिथे काँग्रेसला यश मिळवता आले. याउलट चंद्रपुरात महेश मेंढे, बल्लारपुरात डॉ. विश्वास झाडे व चिमुरात सतीश वारजूकर यांना प्रचारच उभा करता आला नाही. मेंढे यांच्या प्रचाराला तर जिल्हय़ातील काँग्रेसचा एकही नेता किंवा पदाधिकारी आला नाही. त्यामुळे मेंढे भाजपकडून काही मदत मिळते काय या आशेवर घरीच बसून राहिले. ते प्रचारात दिसलेच नाही. उमेदवारांच्या व्यक्तिगत नाराजीने भाजपला २०१४ चे यश मिळवण्यापासून वंचित ठेवले, तर काँग्रेस नेत्यांनी पक्षाऐवजी स्वत:च्या विजयासाठी परिश्रम घेतल्याने त्यांचे संख्याबळ वाढले आहे.