मराठा आरक्षणापाठोपाठ राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती आणल्याने विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, भाजपाने आज (२६ जून) राज्यभरात चक्का जाम आंदोलन केलं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यातील विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलनाचं नेतृत्व केलं. नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात सहभागी होत महाविकास आघाडी सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला.

आंदोलनात कार्यकर्त्यांशी बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, “भाजपा हजारो कार्यकर्ते ओबीसींच्या हक्कां करिता रस्त्यावर उतरले आहेत. माझा विश्वास आहे की, एक तर सरकारला ओबीसींचं आरक्षण पुन्हा द्यावं लागेल, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल. बावनकुळे म्हणतात ते खरंय. हे आरक्षण राजकीय षडयंत्रामुळे गेलंय. आणि हे किती नाटकबाज आहेत. कालपासून नवीन सूर सुरू झाला. मोदीजींनी डेटा दिला नाही. मी चॅलेंज देऊन सांगतो. सत्तेत असलेल्या पक्षांच्या नेत्यांना खुलं चॅलेंज देतो. कुठल्या डेटाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण द्यायला सांगितलं आहे. हा जनगणनेचा डेटा नाहीये. तो इम्पिरिकल डेटा आहे आणि तो राज्य मागासवर्ग आयोगाला जमा करायचा आहे. पण, या सरकारचं एक मस्त आहे. यांचं एकमेकांशी पटत नाही आणि यांचं एका गोष्टीवर एक सुरू आहे. एकमेकांचे लचके तोडत आहेत. पण, सत्तेचे लचके तोडताना तिघंही एकत्र आहेत. जिथे धडपडले. जिथे नापास झाले. तिथे एकाच सुरात बोलतात… हे मोदीजींनी केलं. मोदीजींनी केलं पाहिजे. मला तर असं वाटतं की, एखाद्या दिवशी यांच्या बायकोनं मारलं, तर त्यासाठीही मोदीजींनाच जबाबदार ठरवतील, अशी परिस्थिती यांची झाली आहे,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

हेही वाचा- “ओबीसींचं राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेईन”

काँग्रेस ओबीसी आरक्षणाचे खरी मारेकरी..

“स्वतः काही करायचं नाही. मराठा आरक्षण घालवलं. ओबीसी आरक्षण घालवलं. सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचं आणि मोदीजींनी केलं. मोदींमुळे झालं म्हणायचं. म्हणूनच म्हणालो, यांच्या बायकोनं मारलं तरी म्हणतील मोदीजीच जबाबदार आहेत. पण, ये पब्लिक है, ये सब जानती है. ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण… तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या… ओबीसी आरक्षणाची जी याचिका दाखल झाली, ज्या याचिकेमुळे हा निकाल आला, ही याचिका दोन जणांनी दाखल केली होती. पहिला व्यक्ती म्हणजे वाशिममधल्या काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि दुसरा व्यक्ती भंडारा जिल्हा परिषदेचा काँग्रेसचा अध्यक्ष…, असं म्हणत काँग्रेस ओबीसी आरक्षणाचे खरी मारेकरी आहे” असा गंभीर आरोप फडणवीस यांनी काँग्रेसवर केला.

हेही वाचा- “चुकून तुम्ही सत्तेत आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही”, पंकजा मुंडेंची आगपाखड

मी त्यांना सांगितलं हे मोठं सगळं षडयंत्र…

“ओबीसी आरक्षणाविरोधात ज्यांनी याचिका दाखल केली ते दोन्हीही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत… काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ज्यांची उठबस आहे, काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ज्यांना मान सन्मान दिला जातो… त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. हे दोघे जणं पहिल्यांदा नागपूरच्या उच्च न्यायालयात गेले, त्यावेळी आमचं सरकार होतं. त्यावेळी मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सूत्रं दिली. ग्रामविकास खातं पंकजा मुंडे यांच्याकडे होतं. तिकडे राम शिंदे होते. आमचे संजय कुठे होते? या सगळ्यांना एकत्रितपणे बसवलं. मी त्यांना सांगितलं हे मोठं सगळं षडयंत्र आहे, जे आपल्याला हाणून पाडलं पाहिजे. मी बावनकुळेंचं अभिनंदन करेल, सरकारच्या वतीने ही केस चंद्रशेखर बावनकुळे लढले आणि नागपूरमध्ये उच्च न्यायालयाने आपल्या सरकारच्या बाजूने निर्णय दिला,” असं फडणवीस म्हणाले.