गुरुवारी संध्याकाळी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूरमध्ये एका व्यक्तीने दगड फेकला. यामध्ये पडळकरांच्या गाडीच्या काचेचं नुकसान झालं. मात्र, यावरून राज्यात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गोपीचंद पडळकरांनी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर उलट टीका सुरू झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावरून उलट सत्ताधाऱ्यांनाच खोचक सवाल केला आहे. “गोपीचंदजींनी फेकलेली टोपी तुमच्याच डोक्यावर येऊन कशी बसली?” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी चालवलेली टीका आणि त्यानंतर त्यांच्या गाडीवर फेकण्यात आलेला दगड या मुद्द्यावरून राज्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पडळकर पोटतिडकीने बोलत आहेत”

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांची बाजू घेत त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. “गोपीचंद पडळकरांनी काय भोगलंय हे बघा. त्यांनी काय भोगलंय? कधी गेलंय का कुणी त्यांच्या घरी? आज ते बऱ्या स्थितीत आहे. ते झोपडीमध्ये राहायचे. त्यांनी अनुभवलं की राज्यकर्त्यांनी आम्हाला नाडलं. ते बोलले. मी टोपी फेकली. ती तुमच्या डोक्यावर कशासाठी बसायला पाहिजे? तुम्ही तसं नाही केलं. तुमची लोकांसाठी काम करायची इमेज असेल तर ठीक आहे. गोपीचंद पडळकर आमचे नेते आहेत तसेच ते आमचे कार्यकर्ते देखील आहेत. त्यांचं जे चुकेल त्यासाठी आम्ही त्यांचे कान पकडूच. पण ते बोलतायत ते पोटतिडकीने भोगत आहेत”, असं पाटील म्हणाले आहेत.

 

सोलापुरात काय घडलं?

सोलापूरमध्ये घोंगडी बैठक आटोपून गोपीचंद पडळकर निघाले असताना त्यांच्या गाडीवर एका व्यक्तीने दगड फेकला. यामध्ये गाडीच्या काचेचं नुकसान झालं. कुणालाही इजा झाली नाही. मात्र, यामागे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची टीका पडळकरांनी केली. “राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की पवारांच्या नेतृत्वाखाली कशी गुंडगिरी चालते. माझा आवाज बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, तर तो असा बंद होणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या, तरी मी माघार घेणार नाही. हे सगळे पवारांचे बगलबच्चे टेन्शनमध्ये आहेत. त्यांचं सगळं उघडं पडतंय, बुरखा फाटतोय”, असं पडळकर म्हणाले आहेत.

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक; म्हणाले, “गोळ्या घातल्या तरी…!”

दरम्यान याविषयी पडळकरांनी गुरुवारी सकाळी दगड फेकल्याचा व्हिडीओ शेअर करून पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे”, असं ट्वीट गोपीचंद पडळकर यांनी व्हिडीओसोबत केलं आहे.

 

“हल्ला करून तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील तर…”, दगडफेकीचा व्हिडीओ ट्वीट करत पडळकरांचा निशाणा!

पडळकरांचं ‘ते’ विधान चर्चेत!

दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना शरद पवारांच्या नेतृत्वात दिल्लीत झालेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीची खिल्ली उडवली होती. “मी लहान असल्यापासून शरद पवार गेल्या ३० वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना पुढच्या ३० वर्षांच्या भावी पंतप्रधानपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांचे राज्यात ३-४ खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांचा पक्ष नाही. दिल्लीतलं राजकारण मला कळत नाही. पण कोंबड्याला वाटतं की मी ओरडल्याशिवाय उजाडतच नाही. असे काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. त्यांनी बैठका घेतल्या. यांचं असं झालं आहे की रात गेली हिशोबात आणि पोरगं नाही नशिबात”, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrakant patil backs gopichhand padalkar allegations on ncp chief sharad pawar pmw