भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला असतानाच त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुनही वाद होण्याची शक्यता आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली असं मी म्हणाले. याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम मशीन घेऊन तयार केली. तर त्यांनी जनमत तयार केलं. त्यात चुकीचं काय?,” अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे. या वक्तव्याविरोधात कोणीतरी निदर्शन करणार होतं, मला धमकीही आली होती. पण आम्ही कोणाला छेडणार नाही, पण कोणी छेडलं तर त्याला सोडणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
पुढे ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही. त्यांनी शंकराची पूजा केली आणि हिंदू धर्माची पूजा केली. कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो”.
चंद्रकांत पाटील याआधी काय म्हणाले होते –
“तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.