भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना “राज्यात केव्हाही निवडणुका लागू शकतात”, असं भाकित वर्तवलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये त्याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले असतानाच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत खुलासा केला आहे. आशिष शेलार यांनी नेमकं कोणतं गणित मांडून मध्यावधी निवडणुकांचं भाकित वर्तवलं आहे, याविषयी चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली आहे. पुण्यात बोलताना त्यांनी याविषयी मत व्यक्त केलं.
उद्धव ठाकरेंनी डोळे वटारले आणि…
भाजपा मध्यावधी किंवा नियमित निवडणुका झाल्या, तरी आपल्या ताकदीवर निवडणुका लढवेल. विधानसभेच्या २८८ किंवा लोकसभेच्या ४८ जागा लढवण्याची देखील आमची तयारी आहे. आशिष शेलारांचं विश्लेषण या आधारावर आहे की इतके भांडूनही हे कुणी बाहेर पडत नाहीत. भांडणाचे दोनच परिणाम होतात. एक तर आघाडीतून बाहेर पडणं किंवा दुसरं म्हणजे निवडणुकीला सामोरं जाणं. हे बाहेर पडतच नाहीत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“काँग्रेसच्या नव्याने निर्माण झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत पहिलाच ठराव झाला होता की ३ प्रभागांच्या ठरावाला विरोध करायचा. पण दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी डोळे वटारल्यावर विरोध लगेच मावळला. याचा अर्थ भांडल्यानंतरही सत्तेसाठी सरकारमधून बाहेर पडायला हे तयार नाहीत. त्यामुळेच भांडणाची परिणती मध्यावधीकडे जाणारी आहे”, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
पूरस्थितीनंतरही उद्धवजी अजून बाहेर पडले नाहीत…
दरम्यान, गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या तुफान पावसामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली. मात्र, तरीदेखील उद्धव ठाकरे बाहेर पडले नाहीत, देवंद्र फडणवीस दौऱ्यावर गेले असं पाटील म्हणाले. “एक तर सरकार कोणत्या ना कोणत्या कारणाने बदलेल. पण यावर आशा लावून न बसता प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम सुरू केलं. विदर्भ, मराठवाड्यात प्रचंड पूर आलाय. पण उद्धवजी अजून बाहेर पडले नाहीत. देवेंद्रजी दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळे एक प्रमुख, प्रभावी, दंडशक्ती असणारा विरोधी पक्ष म्हणून काम करणं हा पर्याय आहे”, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नमूद केलं.
“राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात”, आशिष शेलारांचं मोठं विधान!
मनसेबाबतचा निर्णय सहज होणार नाही
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा आणि मनसेच्या युतीविषयी इतक्या सहज निर्णय होणार नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. “मनसे या विषयात इतका सहजासहजी निर्णय होणार नाही. या युतीचा देशातल्या इतर राज्यांत काय परिणाम होईल, हे पाहावं लागेल. त्यामुळे याचा निर्णय केंद्रीय पातळीवरील नेते करतील. राजकारणात फार आधीपासून नियोजन करण्यात अर्थ नसतो. अंदाज घेत बसायचं असतं”, असं ते म्हणाले.