कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित झाल्यानंतर लगेचच काँग्रेस – भाजपामध्ये खडाखडीला सुरुवात झाली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे. काँग्रेसने जयश्री जाधव तर भाजपाने सत्यजीत कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना तसंच काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
“जयश्रीताई निष्ठा महत्वाच्या असतात. मी तुमच्या घरी दोनवेळा आलो, हात जोडून तुम्हाला अचडणी असतील तर त्यावर मात करु यासाठी विनंती केली. तुम्ही कालपर्यंत भाजपाच्या नगरसेविका होत्या. कालपर्यंत तुमचा धीर नगरसेवक होता. चंद्रकांत जाधव हे भाजपाचे, संघाचे अतिशय चांगले कार्यकर्ते होते. अपघाताने तुमचे पती हे काँग्रेसच्या तिकीटावर लढले. पुन्हा एकदा परत येण्याची ही एक संधी होती. त्यामुळे त्यांनी मन मोठं करत दूरचं पहायला हवं होतं. शेवटी या देशाला भवितव्य मोदी आहे. तुम्ही ज्या पक्षाला धरुन बसला आहात त्या पक्षाचे नेते कुठे आहेत शोधायला लागतं,” असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.
“…तर काँग्रेस कायमची मानगुटीवर बसेल”; चंद्रकांत पाटलांचा शिवसैनिकांना सल्ला
“कोल्हापुरची जागा सात पैकी पाच वेळी शिवसेना आणि दोन वेळा काँग्रेस जिंकली. त्यातून ही जागा त्यांनी काँग्रेसला दिल्याने शिवसेनेचा कार्यकर्ते हतबल, नाराज, अस्वस्थ आहेत. रोज सकाळी उठून नवाब मलिकांच्या समर्थनार्थ मोर्चे काढावे लागत असल्याने, अजानची स्पर्धा घ्यावी लागते यामुळे अस्वस्थ आहे. या निवडणुकीत अस्वस्थ शिवसैनिकांना आपल्याला हवं ते करण्याची संधी आहे. ही संधी गेली तर काँग्रेस कायमची तुमच्या मानगुटीवर बसेल. बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस आहे,” असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
“त्यामुळे सावध राहा. उद्या संजय राऊत आम्ही आमच्या घरचं पाहून घेऊ म्हणतील. तुमच्या घरी काय सुरु आहे हे रोज टीव्ही सुरु केल्यावर दिसतंय,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. नाराज शिवसैनिक संपर्कात आहेत का असं विचारलं असता त्यांनी हे सांगण्याइतका कच्चा राजकारणी मी नाही असं ते म्हणाले.
“काँग्रेसची ५० वर्षे आणि भाजपाची पाच वर्षे या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहोत. कोल्हापूरला विकासापासून काँग्रेसने वंचित ठेवले. तर पाच वर्षात भाजपाने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला. यामुळेच आज उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड संख्येने मतदार जमले असून हे सत्यजित कदम यांच्या विजयाचे चिन्ह आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.