पक्षातील नाराज असेलेल्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपाने सुरू केल्याचं दिसत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची समजूत घालण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि संकटमोचक नेते गिरीश महाजन जळगावात पोहचले. बैठकीदरम्यान पक्षांतर्गत वाद झाल्यास ते बाहेर फुटू नयेत, म्हणून बंद दाराआड चर्चा करण्यात आली. परंतु एकनाथ खडसे यांनी बैठक स्थळी हजेरी लावणंच टाळलं.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांच्या विभागवार भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. पण खडसे आणि महाजन यांच्या कार्यकर्त्यांमधील कोल्डवॉरमुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपाच्या बैठका पोलिस संरक्षणात होत आहेत.
माजी मंत्री पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसेंच्या या आरोपाला उत्तर देताना, महाजन यांनी भाजपामधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असं खुलं चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे खडसे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, खडसे यांनी या बैठकीला येणेच टाळलं.
दरम्यान, विधानसभेची उमदेवारी न मिळाल्याने तावडे आणि खडसे दोघेही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत. तावडे यांनी त्याबाबत जाहीर भाष्य टाळले असले तरी खडसे यांनी मात्र अनेक वेळा असंतोषाला वाट करून दिली आहे. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडून ओबीसी नेतृत्वाला मागे खेचण्याचा प्रयत्न होत असून नाराज आपोआप एकत्र येतात, असा आक्रमक सूर खडसे यांनी लावला. पक्षांतर्गत कुरघोडय़ा करणाऱ्या नेते, पदाधिकाऱ्यांची नावे पक्षनेतृत्वाला कळवली आहेत. पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पक्षनेतृत्व काय भूमिका घेते आणि कारवाई करते, ते पाहू, असे खडसे यांनी सांगितले. यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेले भाजपमधील नेते एकत्र येत असल्याचे चित्र आहे.