प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारलाच जबाबदर धरलं जाणार असेल तर मग राज्य केंद्राच्या ताब्यात देऊन टाकावे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकासआघाडी प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रालाच जबाबदार धरणार असेल तर ते राज्य तरी का चालवत आहेत? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा उल्लेखही यावेळी त्यांनी केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पुढील १५ दिवसांत अजून दोन मंत्र्यांवर राजीनाम्याची वेळ येईल असा दावा केला.

“मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे?,” अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली. अगदी १८ महिन्यांपूर्वीच्या सरकार स्थापनेपासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस निराशेकडे गेला आहे असं ते म्हणाले.

“सचिन वाझे ‘वसूली’ सरकारच्या इतके जवळ होते की त्यांनी अधिवेशनात कित्येक तास त्यावर वाया घालवले. नऊ वेळेला विधानसभा स्थगित करावी लागली. म्हणजे केवढं ते प्रेम वाझेंवर…एक मिनिट विधानसभेचा जाणं म्हणजे काही लाखो, करोडो रुपयांचं नुकसान,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान एनआयए कोठडीत मी सचिन वाझे यांची भेट घेतल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले आहेत. आठवीच्या विद्यार्थ्यालाही अनिल परब कसे सहभागी आहेत याची माहिती असेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

“वाझे प्रकरणात राजीनामे होतील, चौकशी होईल, कदाचित एक वेळ अटकही होईल, पण यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. ही संघटीत गुन्हेगारी आहे आणि संघटीत गुन्हेगारीला मोक्का कायदा लागतो. त्यामुळे आमची मागणी आहे की, याप्रकरणात पुरावे समोर आल्यास संबंधितांना मोक्का कायदा लावावा,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान पुढील १५ दिवसांत सरकारच्या आणखी दोन-तीन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ येईल असा दावा त्यांनी केला. “पुढील १५ दिवसांत अजून दोन मंत्री राजीनामे देतील. मला नावं विचारु नका. कोणीतरी न्यायालयात जाईल आणि त्यानंतर अनिल परब यांना राजीनामा द्यावा लागेल,” असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस दलातील संघाशी संबंधित अधिकाऱ्यांचा शोध घेतला जाईल केलेल्या वक्तव्यावरुन त्यांनी टीका केली. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे का? लातूरचा भूकंप असो किंवा कोल्हापुरातील पूरपरिस्थिती प्रत्येकवेळी संघ मदतीसाठी धावला आहे. तुमच्या राजकीय वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढू नका,” असं ते म्हणाले.