राज्यात एकीकडे करोनाची रुग्णसंख्या वाढू लागलेली असताना दुसरीकडे राजकीय टोलेबाजी आणि आरोप-प्रत्यारोप थांबायचं नाव घेत नाहीयेत. भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. यावेळी त्यांनी २०१४मध्ये शरद पवारांनी मारलेल्या टोल्याची देखील आठवण करून दिली आहे. २०१४ साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यावेळी पवारांनी सरकारवर निशाणा साधल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
काय घडलं होतं २०१४ साली?
चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना शरद पवारांनी २०१४ साली राज्य सरकारच्या कारभारावर टीका केल्याचं म्हटलं आहे. “२००९ ते १४ या काळातल्या सरकारला शेवटी शेवटी पवार साहेब म्हणाले होते की मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला आहे. त्यामुळे ते सहीच करत नाही. बाबांची (पृथ्वीराज चव्हाण) स्टाईल होती. की एक फाईल ते सगळी वाचल्याशिवाय सहीच करायचे नाहीत. मग ते खिशातून पेन काढायचे. टोपण काढायचे, पुन्हा लावायचे. आणि शेवटी पेन खिशाला लावून म्हणायचे नंतर बघू. त्यामुळे पवारांनी विधानसभा निवडणुकांच्या २ महिने आधी पाठिंबा काढून घेतला”, असं पाटील म्हणाले.
“तेव्हा सरकारचा पाठिंबा काढून घेण्यापूर्वी सरकारच्या हाताला लकवा मारला आहे असं पवार म्हणाले होते”, असं देखील पाटील यांनी नमूद केलं.
“या सरकारच्या हातालाच नाही, तर..”
“आता या सरकारच्या हातालाच नाही, तर मेंदूलाही लकवा मारला आहे. या सरकारची बुद्धीच चालत नाही. कोणतेही निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत. साधं उदाहरण आहे, पाच आयएएस घालवले तुम्ही. त्यांना आयुष्यात किती काम करता आलं असतं. एसटी कर्मचाऱ्यांचा संप कशाला लांबायला हवा. सरकारी कर्मचाऱ्यांचे जेवढे फायदे आहेत, ते देता आले असते त्यांना. ६० च्या वर कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत”, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.