मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली होती. अटक केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्याने सुटका करण्यात आली आहे. दरम्यान नारायण राणे यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
Narayan Rane Gets Bail : राणेंना अटक व जामीन
“नारायण राणेंना जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने त्यांच्या बोलण्यावर काही बंधनं आणली असतील. पण राणे पोलिसांच्या तावडीतून बाहेर पडले आहेत. नारायण राणे बुधवारी काहीही भाषण न करता सिंधुदुर्गात फिरले तरी हजारो लोक राणेंना पहायला येतील. माझा राजा, माझा नेता सुरक्षित आहे की नाही पहायला येतील,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने अखेर सत्याचा विजय झाला आहे. मविआ घटकपक्ष शिवसेनेने सूडबुद्धीने,आततायी कारवाई करून @MeNarayanRane यांना अटक केली, संसदीय संकेतांना हरताळ फासला आणि द्वेषाचे राजकारण टोकाला नेले,यासाठीही हा दिवस नेहमीच स्मरणात राहील.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 24, 2021
“राज्य सरकारने सूडबुद्दीने राणेंना गोवण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाने त्यांना थापड मारली. गेल्या २० महिन्यात हे सरकार फक्त थापडा खात आहे. कोणतीही केस हे जिंकू शकत नाहीत. कारण पोलिसांच्या आणि गुंडांच्या बळावर सरकार चालवत आहेत. पण आता हे चालणार नाही. ही अरेरावी संपली आता…तुम्ही सांगितल्यानंतर सगळ्यांनी घऱात बसायचं ती सक्ती संपली,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.
“जन आशीर्वाद यात्रा सुरु होईल. घाबरटाप्रमाणे सिंधुदूर्गात लागू केलेली संचारबंदी मागे घ्या, अन्यथा संचारबंदी मोडून जन आशीर्वाद यात्रा जाणार,” असा इशाराच यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.