पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजप आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार केला. यादरम्यान भाजपा नेते अवधूत वाघ यांनी केलेल्या एका ट्वीटवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंजाब दौऱ्यात मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार होता.
“जर ते आंदोलक होते तर त्यांच्या हातात भाजपाचा झेंडा कसा काय?”
यानंतर अवधूत वाघ यांनी ट्वीट करत पंजाबच्या “मुख्यमंत्र्यांना मरेपर्यंत फासावर लटकवा,” असं ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवरुन जोरदार टीका केली जात आहे.
चंद्रकांत पाटलांनी दिली प्रतिक्रिया
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीला जाऊन मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसोबतच वेगवेगळ्या मुद्द्यावंर भाष्य केलं.
यावेळी त्यांना अवधूत वाघ यांनी केलेल्या ट्वीटसंबधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांचे शब्द, त्याचा अर्थ यावर सहमती नाही. पण त्यांच्या भावना….ही केवळ परमेश्वराची कृपा. भविष्यात त्यांच्या हातून काहीतरी मोठं व्हायचं आहे म्हणून ते वाचले. नाहीतर २० मिनिटं अशा ठिकाणी गाडी उभी होती की कोणीही हल्ला केला असता. त्यांच्या चारही बाजूने सुरक्षारक्षक होते. हातापाई झाली असती तर त्या हातापाईत त्यांचा प्राणही गेला असता. त्यामुळे ही त्यांची भावना आहे. शब्द जपूनच वापरायचे असतात, पण भावना बरोबर आहेत”.
नाना पटोलेंवर टीका
नाना पटोले यांनी पंजाबमध्ये जे काही झालं ते नौटंकी असल्याचं म्हटलं असून इंदिरा गांधी आणि मोदींची तुलना होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “तुलना कोणाचीच कोणाशी होत नाही. पण इंदिरा गांधींशी तुलना करुन त्यांच्याप्रमाणेच मोदींचं व्हावं अशी अपेक्षा करत आहात का? आपण काय बोलतो, त्याचा काय अर्थ लागतो याचा आपल्याला तरी पत्ता असतो का. नौटंकी तर तुम्ही करत आहात..विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा देता, राज्याचे अध्यक्ष होता, मंत्रिमंडळाची इच्छा व्यक्त करता”.
शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
उद्धव ठाकरेंना आयती थाळी मिळाल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी बाळासाहेबांनी भाजपाला राज्याची आयती थाळी दिली आहे असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांचं इतिहासाचं ज्ञान कमी तरी आहे किवा ते वेड पांघरत आहेत. शेवटी भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली. अगदी भाजपाची स्थापना १९८० मध्ये झाली. ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली तेव्हा देशातील नऊ राज्यांमध्ये एकत्रित का असेना पण सरकार आलं होतं. त्यामुळे कोणी कोणाला मोठं केलं हे सर्व जगाला माहिती आहे”.
पुढे ते म्हणाले की, “बाळासाहेबांचे ऋण भाजपा वाढवण्यासाठी नाही तर हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही मानतो. अलीकडच्या दोन वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी ती परंपरा चालू ठेवली नाही. आधी ते हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते, भविष्यातील माहिती नाही. पण या २ वर्ष २६ महिन्यात बाळासाहेबांची परंपरा चालू ठेवली नाही म्हणून आमचा आक्षेप आहे”.
“उद्धव ठाकरेंनी कधी पालिकेचीही निवडणूक लढवली नाही हेदेखील खरं आहे. ज्या मुंबई शहरात २० वर्षांपासून त्यांचं राज्य आहे तिथेही निवडणूक लढण्याची हिंमत दाखवली नाही. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेबांची पुण्याई आहेच..त्याच्याच आधारे त्यांना आयती थाळी मिळाली हे माझं मत आहे,” असं ते म्हणाले.
भुजबळांना सुनावलं
मोदींच्या पुण्याईमुळे चंद्रकांत पाटील कोल्हापूर आणि पुण्यातून निवडून येतात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं असून यावर बोलताना ते म्हणाले की, “भाजपा युवा मोर्चाच्या बैठकीत बोलताना मी कोणतीही परंपरा नसताना आयुष्यात मोठं व्हायचं आहे असं मी सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची पुण्याई होती त्यामुळे आयतं मिळालं, तसं तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला परिश्रम करावे लागतील असा संदर्भ होता. आता तेवढंच एक वाक्य काढून बोलायचं असेल तर ठीक आहे”.
“माझे वडील ना सरपंच होते ना ग्रामपंचाय सदस्य होते. भुजबळांना काय माहिती आहे? आयुष्यातील ऐन तरुणाईतील १३ वर्ष मी संघटनेसाठी घर सोडलं होतं. मला माझी टीमकी वाजवण्याची सवय नाही भुजबळ. आम्ही एका वाडीत राहत असल्याने त्यांना ओळखतो. भुजबळांचा जो पालिकेचा वॉर्ड आहे तिथे आजही माझं घर आहे. आयुष्याची २० ते ३३ वर्षे मी संघटनेसाठी दिली. मी देशभरात प्रवास केला आहे. त्यामुळे भुजबळांनी मला शिकवू नये,” असंही यावेळी ते म्हणाले.