राज्यात एकीकडे विरोधक वारंवार सरकार अस्थिर करण्यासंबंधी वक्तव्य करत असताना महाविकास आघाडीमधील नेते मात्र सरकार पाच वर्ष टीकेल असा विश्वास व्यक्त करत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरकार पडणार असल्याचा दावा करत असताना खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल असं ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.

“देवेंद्र फडणवीस मध्यंतरी झोपेतून उठलो तर सरकार गेलं होतं इतका विश्वासघात झाला असं म्हणाले होते. केसाने गळाने कापतात म्हणतात तसंच काहीसं….तुम्ही सरकार कधी पडणार विचार आहात असं विचारत आहात तर मी सांगतो की, असेच सगळे झोपेत असताना सरकार जाईल. कळणारच नाही कधी गेलं,” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मराठा समाजाने रस्त्यावर उतरावं –
दरम्यान याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. “मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरुन संघर्ष नाही केला, तर वेळ निघून जाईल. त्यामुळे कोणताही झेंडा, बॅच न घेऊन भाजपा आंदोलनात सहभागी होणार आहे,” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजीराजे यांच्या भूमिकेबद्दलही त्यांनी आपली मत व्यक्त केलं. “भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाही आहेत. त्यांचा केलेला सन्मान आणि किती कामे मार्गी लावली हे कदाचित इतरांना माहित नाही,” असं ते म्हणाले.

चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली पण मोदींनी भेट दिलेली नाही असे संभाजीराजे यांनी म्हटले होते त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. “संभाजीराजेंनी ४ वेळा भेट मागण्याच्या आधी ४० वेळा मोदींजीसोबत त्यांची भेट झाली आहे. राजे भेट मागतात मोदीजी भेट द्यायचे. कोविड पराकोटीला गेला आहे आणि ज्यासाठी ते भेट मागत आहे, तो विषय केंद्राचा नसून राज्याचा आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Story img Loader