विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन संपलं आहे. दोन दिवसांच्या वादळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीबीआय, ईडी यांच्यामार्फत चौकशीतून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न याआधीही अयशस्वी झाले आहेत आणि यापुढेही ते अयशस्वी होतील असं स्पष्ट केलं. दरम्यान यावेळी त्यांनी युती शक्य नसल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
“हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखं बोलायचं एक आणि करायचं एक होतील असं माझ्यासारख्या व्यक्तीने अपेक्षित केलं नव्हतं,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या युतीसंबंधी वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लगावला.
३० वर्षे एकत्र राहून काही झाले नाही ते पुढे काय होणार?
“शरमेने मान खाली घालण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यासाठी पण मान शरमेने खाली गेली पाहिजे. यांच्यासोबत आपण लढलो, त्यांच्याबरोबर शपथा घेतल्या, मोदींच्या प्रतिमेचा वापर केला आणि काही संबंध नाही असं म्हणून गेलात त्यानेही मान शरमेने घातली पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेनेला सुनावलं आहे.
“भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली. आमच्या कार्यकर्त्याने काही म्हटलं असेल तर ते सरकारला म्हटलं असेल. सरकार हरामखोर वैगेरे…पण भास्कर जाधव यांना तुम्ही असं कोणी म्हटलं नाही. पण भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
“बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखं वागतील असं वाटलं नव्हतं” https://t.co/vZSXWIW6Tl < येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #BalasahebThackeray #CMUddhavThackeray #SharadPawar #ChandrakantPatil @OfficeofUT @ShivSena @ChDadaPatil @BJP4Maharashtra pic.twitter.com/r0LKhGFlgD
— LoksattaLive (@LoksattaLive) July 7, 2021
“निलंबन केलेल्या आमदाराचा विश्वासदर्शक ठरावाचा आणि अध्यक्ष निवडणुकीतला मताचा अधिकार निलंबनामुळे जात नाही. हे इतके का घाबरत आहेत…१७० जण आहात ना,” असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी गुप्त मतदान घ्या असं आव्हानच दिलं आहे. नियमांत बदल केला तर कोर्टातून स्थगिती आणू असा इशाराही यावेळी त्यांनी दिली.