बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा बाजूला कसं ढकलता येईल आणि आपण कसे क्लीन आहोत हे दाखवण्याचा जो प्रय़त्न आहे तो निंदनीय आहे,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

“मुंडेंच्या बाबतीत जी घटना घडली त्यामध्ये भाजपाने सुरुवातीपासूनच तक्रार खरी की खोटी असल्याचं ठरवून मग निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. पण वारंवार आम्ही रेणू शर्मा व्यत्तिरिक्त पीडिता करुणा शर्मा यांच्याबद्दल बोला असं सांगत होतो. धनंजय मुंडे यांनी आपले संबंध असल्याचं तसंच त्यातून मुल असल्याचं आणि प्रतिज्ञापत्रात दोन्ही मुलं दाखवली नाहीत हेदेखील मान्य केलं. हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही राजीनामा मागितला होता,” असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.

पुढे ते म्हणाले की, ‘”पण शिताफीने रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली म्हणजे ते निर्दोष आहेत, त्यांना क्लीन चीट द्या, बदनामी झाली असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अरे काय चाललंय काय? महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?”.

“मी माझ्या पत्रकार परिषदेत ११ उदाहरणं दिली होती. तुमच्यावर कोणी आरोप केले नाहीत तर तुम्ही शरिरसंबंध होते हे मान्य करता. हे भारतीय परंपरेत बसतं? हिदू कायद्यात दोन बायकांना परवानही आहे? मुल न दाखवण्यालाही परवानही आहे? जणू काही क्लीन चीट मिळाली असे ढोल वाजवले जात आहेत,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. तक्रार मागे घेण्यासाठी दबाब होता का? याची माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे असं सांगताना हे जे चाललं आहे ते महाराष्ट्राच्या सुसंस्कृतीसाठी घातक आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader