Chandrakant Patil on Dhananjay Munde: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड महिना होऊन गेला आहे. मात्र तरीही अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तसेच ज्यांना आरोपी म्हणून अटक केली, त्यांच्यावरही कडक शासन होत नाही, अशी ओरड बीडमधील लोकप्रतिनिधी करत आहेत. तसेच कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. चौकशी होईपर्यंत मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे, अशी मागणी होत आहे. यावर आता भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी विविध विषयांवर भूमिका व्यक्त केली. धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय का? असा प्रश्न त्यांना विचारला गेला. यावर ते म्हणाले, “मस्साजोग प्रकरणात चौकशी सुरू आहे. राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थ आहेत. त्यांना जर वाटले की, या प्रकरणात काही तथ्य आहे. तर ते ताबडतोब धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगतील.”
पोलीस यंत्रणा हत्या प्रकरणाची चौकशी करत अलून एसआयटीही नेमण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींना मकोका लावण्यापर्यंत तसेच वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यापर्यंतची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. पण माध्यमात विविध बातम्या आल्या तर त्याचा चौकशीवर परिणाम होतो, असेही ते म्हणाले.
दुष्काळामुळे जत तालुक्यात पिण्याचे आणि शेतीचे पाणी पुरेसे मिळत नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तेथील नागरिक कर्नाटकामध्ये जाण्यास इच्छुक होते. परंतु आता टेंभू योजनेतून जत तालुक्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तलावत पाणी पोहोचण्याचे काम जवळजवळ ६० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच पाणी हा सांगलीचा प्रश्न निर्माण उरणार नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.