विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. दरम्यान भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तालिका सदस्य भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला. विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या असं म्हणत विरोधकांना सुनावलं होतं. त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली असल्याचा आरोप केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखं वागतील असं वाटलं नव्हतं”

“भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली. आमच्या कार्यकर्त्याने काही म्हटलं असेल तर ते सरकारला म्हटलं असेल. सरकार हरामखोर वैगेरे…पण भास्कर जाधव यांना तुम्ही असं कोणी म्हटलं नाही. पण भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या युतीच्या वक्तव्यारुन टीका

“हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखं बोलायचं एक आणि करायचं एक होतील असं माझ्यासारख्या व्यक्तीने अपेक्षित केलं नव्हतं,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या युतीसंबंधी वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लगावला.

भाजपा आमदारांनी शिव्या दिल्या, मी फडणवीसांना म्हणालो आवरा पण… ; अध्यक्षांनी सांगितलं काय घडलं

“शरमेने मान खाली घालण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यासाठी पण मान शरमेने खाली गेली पाहिजे. यांच्यासोबत आपण लढलो, त्यांच्याबरोबर शपथा घेतल्या, मोदींच्या प्रतिमेचा वापर केला आणि काही संबंध नाही असं म्हणून गेलात त्यानेही मान शरमेने घातली पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेनेला सुनावलं.

गुप्त मतदान घ्या, ठाकरे सरकारला आव्हान

“निलंबन केलेल्या आमदाराचा विश्वासदर्शक ठरावाचा आणि अध्यक्ष निवडणुकीतला मताचा अधिकार निलंबनामुळे जात नाही. हे इतके का घाबरत आहेत…१७० जण आहात ना,” असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी गुप्त मतदान घ्या असं आव्हानच दिलं आहे. नियमांत बदल केला तर कोर्टातून स्थगिती आणू असा इशाराही यावेळी त्यांनी दिली.

Story img Loader