राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या या बंडखोरीवर आणि आरोपांवर प्रतिक्रिया दिली. तसेच अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. ते गुरुवारी (६ जुलै) नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
“शरद पवारांना वारंवार खोटं बोलावं लागलं”
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवार आमच्या सर्वांसाठी आदरणीय आहेत. परंतू ज्या पद्धतीने अजित पवारांनी शरद पवारांचा संपूर्ण आलेख मांडला त्यावरून असं दिसतंय की त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे पक्षही अडचणीत आला आणि त्यांच्याबाबतची विश्वासार्हताही कमी झाली. शरद पवारांना कुटुंबातही वारंवार खोटं बोलावं लागलं. म्हणजे या राजकारणापासून कुटुंबही सुटलं नाही.”
हेही वाचा : VIDEO: “अरे पण गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का?”; छगन भुजबळांचा थेट शरद पवारांनाच प्रश्न, म्हणाले…
“अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सत्यपरिस्थिती सांगितली”
“अजित पवारांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र आणि देशाच्या हिताची आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे या सर्वांनी त्यांना बाहेर का यावं लागलं, वेगळं व्हावं लागलं हे मांडलंच आहे. त्यामुळे हे कशामुळे झालं आहे हे पाहिलं पाहिजे. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सत्यपरिस्थिती सांगितली आहे,” असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.
“अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे”
“मी स्वतः पवार कुटुंबातील असून कधी खोटं बोलू शकत नाही, असं अजित पवारांनी नमूद करत गंभीर विधानं केली आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. महाराष्ट्र त्यावर विश्वास ठेवेल,” असंही बावनकुळेंनी नमूद केलं.