राज्यात सत्ताबदल होऊन आता दोन महिने उलटले आहेत. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेसोबतच इतरही महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या निवडणुका नेमक्या कधी होतील, याविषयी अद्याप निवडणूक आयोगाने घोषणा केलेली नसली, तरी त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून हळूहळू प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी दौरा केला. यानंतर शरद पवार महाराष्ट्रात देखील दौऱ्यावर जाणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
बावनकुळे-राज ठाकरे भेट, चर्चांना उधाण
चंद्रशेखर बावनकुळेंनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट कौटुंबिक स्वरूपाची असल्याची प्रतिक्रिया बावनकुळेंनी त्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली. मात्र, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता बावनकुळेंनी “युतीबाबत आमचे दिल्लीतील आणि राज्यातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, माझ्याकडे फक्त पक्षवाढीचं काम आहे”, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना बावनकुळेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर देखील टीकास्त्र सोडलं. “मी २९ वर्षापासून भाजपाचं काम करतो. उद्धव ठाकरे आता खरंच हिंदुत्ववादी राहिले नाहीयेत. त्यांनी सगळं सोडून दिलं आहे. कौटुंबिक प्रेमात ते सगळ्या गोष्टी विसरून गेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या कार्याला बगल देऊन ते आपलं काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही”, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
“शरद पवार जेव्हा जेव्हा सत्तेत आले…”
दरम्यान, शरद पवारांच्या ठाणे दौऱ्याविषयी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्षांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “यापूर्वी शरद पवारांनी खूप वेळा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. पण कधी ६० च्या वर (६० विधानसभा आमदार) गेले नाहीत. आजपर्यंतचं त्यांचं राजकारण पाहिलं तर ते जेव्हा केव्हा सत्तेत आले, तेव्हा कुणालातरी तोडून, संपवून आले आहेत”, असं बावनकुळे म्हणाले.
भाजपा-मनसे युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळेंचं सूचक विधान, तर्क-वितर्कांना उधाण!
“जनता त्यांना विचारेल, अडीच वर्ष…”
“त्यांना अडीच वर्ष उद्धव ठाकरेंसोबत संधी होती महाराष्ट्र फिरण्याची. करोना काळात लोक मरत असताना ते फिरू शकले असते. पण ते नाही फिरले. आता ते फिरत आहेत. पण महाराष्ट्राची जनता त्यांना विचारणार आहे की अडीच वर्ष तुम्ही कुठे होते?”, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.