राज्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांच्या रुपाने कसब्यात विजय मिळवला. यानंतर भाजपाविरोधातली नाराजी मतदारांनी व्यक्त केल्याची भावना विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीवर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानावरून शरद पवारांना खोचक सल्ला दिला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कसबा पोटनिवडणुकीतील निकालांचा उल्लेख करत भाजपाला इशारा दिला आहे. “हा बदल आहे. आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरून तर फक्त दोन ठिकाणी भाजपाला जास्तीची मतं मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजपा मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना जास्तीची मतं मिळाली. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत हे स्पष्ट होतंय”, असा इशारा शरद पवारांनी यावेळी बोलताना दिला.
दरम्यान, शरद पवारांच्या या विधानावर बावनकुळेंनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “चिंचवडमध्ये दोघांच्या मतांची बेरीज केली तरी आम्ही अधिक आहोत. आम्ही ५१ टक्क्यांची लढाई जिंकलीये. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ५१ टक्क्यांची लढाई जिंकून निवडून आल्या आहेत. एकीकडे ४ टक्के मागे पडलो आहोत. ही ४ टक्के मतं भरून काढणं ही आमची जबाबदारी आहे. पुन्हा जनतेमध्ये जाऊ. पुन्हा जनतेला विश्वासात घेऊ. काही आमच्याकडून चुकलं असेल तर ते दुरुस्त करू”, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
“पवारांनी निकाल बघून घ्यावेत”
“मला वाटतं शरद पवारांनी काल तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील.त्यांनी आज ते बघून घ्यावेत. संपूर्ण काँग्रेस साफ झालीये. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पक्ष जोडण्याचा प्रयत्न केला. पण उलट पक्ष कमी झाला. तीन राज्य हातातून गेले. शरद पवार जे सांगत आहेत ते कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी सांगत आहेत”, असं बावनकुळे माध्यमांना म्हणाले.
“हे पुण्यात घडतंय याचा अर्थ…”, शरद पवारांचं सूचक विधान; कसबा पोटनिवडणूक निकालांचा केला उल्लेख!
संजय राऊतांच्या विधानाचाही समाचार!
दरम्यान, चिंचवडमधला विजय भाजपाचा नसून अश्विनी जगताप यांचा असल्याचं विधान संजय राऊतांनी केलं होतं. त्यावरही बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अश्विनी जगताप यांचा विजय भाजपाचा विजय नाही तर मग इकडे महाविकास आघाडी आहे का? इकडे धंगेकरांचा विजय आहे. खरंतर कसब्यात सुप्त सहानुभूतीची लाट धंगेकरांच्या बाजूने होती. तिथे भाजपा-काँग्रेस लढाईच झाली नाही. तिथे उमेदवारांमध्ये लढाई झाली. त्यात आमचा उमेदवार पहिल्यांदा निवडणूक लढला”, असं बावनकुळे म्हणाले.