मुंबईत दोन दसरा मेळाव्यांच्या अनुषंगाने राजकीय घडामोडी वाढल्या असताना राज्यभर त्याची चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. दसरा मेळावे आणि त्यातील भाषणांमधून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यताआहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दोन्ही बाजूंची नेतेमंडळी दिसत आहेत. मात्र, त्यामध्ये भाजपानं उडी घेत शिवसेनेवर खोचक टोला लगावला आहे. आधी पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली असताना आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
‘सामना’तील भूमिकेवर घेतलं तोंडसुख!
चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी बोलताना ‘सामना’ अग्रलेखातील भूमिकेवरून उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंच्या मनात जे आहे ते सामनातून प्रकाशित करतात. उद्धव ठाकरे बावचळलेल्या परिस्थितीत बोलतात. सत्ता गेल्यामुळे त्यांचा संयम सुटला आहे. सत्ता गेल्यानंतर संयम सुटायला नको”, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
काय म्हटलंय सामना अग्रलेखात?
‘सामना’च्या अग्रलेखातून आज भाजपा आणि शिंदे गटावर टीकास्र सोडण्यात आलं आहे. “भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्क्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पदावर येताच जाहीर केले की, “योग्य वेळ येताच विदर्भ हे स्वतंत्र राज्य करू”. म्हणजे देशात इतर नवी राज्ये निर्माण होतील तेव्हा विदर्भाचा लचका तोडू असेच मनसुबे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचे आहेत व त्यावर सत्तेतला ‘मिंधे’ गट गप्प बसला आहे. महाराष्ट्राची अखंडता, मुंबईची महाराष्ट्राशी असलेली नाळ तोडायची असेल तर आधी शिवसेनेची वज्रमूठ तोडावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रातून मुंबईचा लचका तोडता येणार नाही हे माहीत असल्यानेच एका ठरलेल्या कारस्थानानुसारच मुंबई-महाराष्ट्रातील घटना वेगाने घडत आहेत,” असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.
“उमेदवारही मिळणार नाही अशी अवस्था होईल”
दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरूनही बावनकुळेंनी टीका केली आहे. “अंधेरी विधानसभेची जागा भाजपा १०० टक्के जिंकेल. शिंदे गट आणि भाजपाच्या युतीच्या माध्यमातून आमचा या निवडणुकीत ऐतिहासिक विजय होईल. उद्धव ठाकरेंनी विचारही केला नसेल, एवढं मतदान होणार आहे. अडीच वर्षांचा राग अंधेरीच्या निवडणुकीत निघेल. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारही मिळणार नाही अशी अवस्था होईल”, असं ते म्हणाले.
“काँग्रेस-राष्ट्रवादीची गर्दी आणून उद्धव ठाकरेंचा मेळावा होणार आहे. शिंदेंकडे ४० आमदार, १२ खासदार आणि जनशक्तीचा मोठा गट आहे. तो मेळावा मोठा होईल. काहीजण टीका करत आहेत की सत्तेचा गैरवापर केला जात आहे. पण त्यांनी अडीच वर्षांत सत्तेचा किती गैरवापर केला. सत्तेची किती मस्ती केली. स्वत:चे कारखाने भरण्याकरता, स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी काय काय केलं?” असा सवालही बावनकुळेंनी उपस्थित केला आहे.
टोमणे सभा!
दरम्यान, यावेळी बोलताना बावनकुळेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ‘टोमणे सभा’ म्हणत खोचक टोला लगवला. “आत्ता उद्धव ठाकरे बावचळलेल्या स्थितीत आहेत. आजही टोमणेसभा होणार आहे. ते खूप टोमणे मारतील. ते अपेक्षितच आहे. त्यांना आता दुसरं काही काम नाहीये. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विकासाचे स्पायडरमॅन आहेत. ते विकासाबद्दल बोलतील”, असं बावनकुळे म्हणाले.