गेल्या वर्षी शिवसेनेत आत्तापर्यंतची सर्वात मोठी फूट पडून शिंदे गट वेगळा झाला आणि भाजपाशी युती करून नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, फडणवीसांनी एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र, २०२४ नंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसच युतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा चालू आहे. भाजपाकडून अद्याप यावर कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या विधानामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक विधान केलं. एकीकडे त्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री करावं ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचं म्हटलं असलं, तरी २०२४ नंतर मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय गणितांवर आधारित निर्णय घेतले जातील, असं ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
“२०२४पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत असं आमच्या नेतृत्वानं स्पष्ट केलंय. मीही स्पष्ट केलंय. २०२४ नंतर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांनी जर भावना व्यक्त केली तर त्यात गैर काय? ज्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला मुख्यमंत्री व्हावा अशी भावना असतेच. त्याला असं का वाटू नये?” असा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित केला आहे.
२०२४ नंतर मुख्यमंत्री बदलणार?
दरम्यान, भाजपाच्या आत्तापर्यंतच्या भूमिकेनुसार बावनकुळेंनीही २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, अशीच भूमिका मांडली. मात्र, नंतर गोष्टी ठरतात असं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री बदलाचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे. “कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं हा भावनिक प्रश्न आहे. शेवटी नंतर राजकारणात किंवा सत्तेत जे ठरतं ते ठरतं. पण हे वाटणंही अयोग्य नाही”, असं बावनकुळे म्हणाले आहेत.