गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित असं यश मिळू शकलं नसल्याचं सांगितलं जात आहे. आधी शिक्षक-पदवीधर मतदारसंघात याची प्रचिती आल्यानंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराचा पराभव झाला. चिंचवडमध्ये विजय मिळूनही विरोधातील दोन उमेदवारांच्या मतांची बेरीज भाजपा उमेदवारापेक्षा जास्त ठरली. यामुळे पक्षांतर्गत चिंतनाची भूमिका राज्यातील भाजपाच्या सर्वच नेत्यांनी घेतली होती. यानंतर आता महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, मागील निवडणुकांमुळे नसून आगामी नवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बदल होणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षांतर्गत चिंतन करण्याची भूमिका नेतेमंडळींकडून घेण्यात आली होती. पराभव का झाला, याची कारणमीमांसा केली जाईल, अशी प्रतिक्रिया अनेक भाजपा नेत्यांनी दिली होती. यानंतर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीव्ही ९ शी बोलताना प्रदेश भाजपाची पुनर्रचना होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, कसबा निवडणूक निकालामुळे ही पुनर्रचना केली जाणार असल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळून लावला आहे.
“येत्या महिन्याभरात पुनर्रचना”
“राज्यात या महिन्यात काही पुनर्रचना केल्या जाणार आहेत. मी सहा महिन्यांपूर्वी राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारला. त्यानंतर पुनर्रचना करण्याचा विचार होताच. पण राज्यभर प्रवास करून नंतर पुनर्रचना करावी असा विषय होता. काही ठिकाणी पुनर्रचना होईल, काही ठिकाणी नवे जिल्हाध्यक्ष येतील. काही ठिकाणी प्रदेशावर पुनर्रचना होईल. पण येत्या महिना-दीड महिन्यात पुनर्रचना होईल”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
“ही पक्षाची कार्यकारिणी असते. निवडणुकीचा काळ आहे. अनेक कार्यकर्त्यांना त्या त्या भूमिकेत यावं लागतं. राज्यातले पदाधिकारी वेगळ्या भूमिकेत येतात. अनेक रचना कराव्या लागणार आहेत. त्यामुळे योग्य कार्यकर्ता व नेत्याला योग्य काम देणं आणि निवडणूक जिंकण्याचं लक्ष्य यासाठी आम्ही पुनर्रचना करणार आहोत”, असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.
“आमच्या मित्रांना कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली…”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत
याच अधिवेशनात नुकसान भरपाईचा निर्णय..
दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना याच अधिवेशनात नुकसान भरपाईचा निर्णय होईल, असे संकेत बावनकुळेंनी यावेळी दिले. “महाराष्ट्रात झालेल्या नुकसानासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. आज अधिवेशनात काही आमदार मागणी करणार आहेत. अनेक शेतकऱ्यांची होळी अश्रूंमध्ये गेली आहे. सरकार जास्तीत जास्त मदत देईल असं मला वाटतं”, असं ते म्हणाले.