गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राहुल गांधींनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी “सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, त्यांनी ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला होता”, अशी विधानं केली आहेत. राहुल गांधींनी हिंगोलीत बोलताना केलेल्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत असून त्यावरून भाजपानं काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी काँग्रेसची साथ देत असलेल्या ठाकरे गटावरही भाजपानं टीकास्र सोडलं आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, राहुल गांधींनी त्यांच्या वक्तव्यासाठी देशाची माफी मागायला हवी, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्ही राहुल गांधींना सोडणार नाही”

“राहुल गांधींनी देशाचा अपमान केला आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. त्यांनी सावरकरांबद्दल जे बोललंय, ते हिंदुस्थानमधील कुणीही व्यक्ती सहन करणार नाही. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींनी जे काही कमावलं, ते सगळं घालवलं. भाजपा यावर आंदोलन करणार. राहुल गांधींच्या यात्रेमध्ये आम्ही कधीच आडकाठी केली नाही. पण ज्याप्रकारे ते सावरकरांबद्दल बोलतायत, आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यांचा निषेध आम्ही महाराष्ट्रभर करणार”, असं बावनकुळे म्हणाले.

“राहुल गांधींवर गुन्हा दाखल करा”

दरम्यान, राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बावनकुळेंनी केली आहे. “यात्रा थांबवायची असती, तर आम्ही आधीच थांबवली असती. पण महाराष्ट्रात, विदर्भात येऊन सावरकरांबद्दल त्यांनी असं बोलणं हे भाजपा खपवून घेणार नाही. त्यांना महाराष्ट्रात येण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. राहुल गांधींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे”, असं ते म्हणाले.

“…म्हणून राहुल गांधींचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे” ; आशिष शेलारांचं पत्रकारपरिषदेत विधान!

“एक दिवस उद्धव ठाकरे काँग्रेसची भाषा बोलतील”

“जेव्हा राजीव गांधींची जयंती किंवा पुण्यतिथी असते, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली देतात. पण आज राहुल गांधींनी कुठेही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचं पूजन केलं, त्यांच्याबद्दल चार शब्द बोलले असं दिसलं नाही. उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष पूर्णपणे काँग्रेसच्या वेठीला बांधला आहे. काँग्रेस पक्षाला ते समर्पित झालेले आहेत. सावरकरांबद्दल इतकं आक्षेपार्ह विधान केल्यावर उद्धव ठाकरेंनी भारत जोडो यात्रेचा बहिष्कार करावा अशी आमची अपेक्षा होती. पण आता उद्धव ठाकरेंनी फक्त काँग्रेसचं संविधान स्वीकारायचं बाकी ठेवलं आहे. एक दिवस उद्धव ठाकरे जे काँग्रेस बोलतंय, त्याप्रमाणे वीर सावरकरांबद्दल बोलतील असं मला वाटतं”, अशा शब्दांत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrashekhar bawankule slams uddhav thackeray on rahul gandhi veer sawarkar pmw