सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा, करोना काळात त्याचं काम चालूच राहिलं तेव्हा आणि हा प्रकल्प पूर्ण झाला तेव्हाही तो वादातच राहिला. आता या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आहेत. विरोधकांकडून या उद्घाटन सोहळ्याला अनुपस्थित राहण्याची भूमिका घेतलेली असताना सत्ताधारी मात्र ठाम आहेत. त्यामुळे या प्रकल्पावरून नेमका कधीपर्यंत वाद चालू राहणार? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना उपनेत्या अयोध्या पौळ यांच्यात या मुद्द्यावरून ट्विटर वॉर रंगलं आहे.
नेमका वाद काय?
संसदेच्या नव्या इमाकरतीचं उद्घाटन या आठवड्यात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते उद्घाटन केलं जाणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आलं नाहीये. हे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्तेच व्हावं, अशी मागणी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे. दुसरीकडे एमआयएमनं विधानसभा सभापतींच्या हस्ते हे उद्घाटन केलं जावं, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या चित्र वाघ यांनी केलेल्या एका ट्विटवर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी उत्तर दिलं आहे.
काय आहे चित्रा वाघ यांच्या ट्वीटमध्ये?
चित्रा वाघ यांनी संसद भवन उद्घाटनाला विरोध करणाऱ्या विरोधकांना उद्देशून एक ट्वीट केलं आहे. “विरोधी पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकासाच्या दृष्टीकोनाची अॅलर्जी आहे. त्यातूनच लोकशाहीचं मंदिर नवीन संसदेच्या उद्घाटनाला विरोध करण्याची दुर्बुद्धी सुचलीये. हे सगळे संकुचिक मनोवृत्तीचे पुतळे”, असं वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“जनतेनं तीनशेपेक्षा अधिक खासदार संसदेत पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला. काही पक्ष ५० खासदारांच्या पुढे गेले नाही. काही पक्षांना भोपळा फोडता आला नाही तर काहींचा पक्षच उरला नाही. खऱ्या अर्थाने संसदेच्या कार्यक्रमाला बॉयकॉट करणाऱ्यांना जनतेनंच बॉयकॉट केलं आहे आणि २०२४ लाही जनता तेच करेल”, असंही चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
Video: “आता असे दिवस येतील की…”, उद्धव ठाकरेंनी दिला गंभीर इशारा; म्हणाले, “फक्त केंद्रातच…”!
अयोध्या पौळ यांची खोचक प्रतिक्रिया
दरम्यान, चित्रा वाघ यांच्या ट्वीटवर ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांनी खोचक ट्वीट केलं आहे. “जागतिक स्तराच्या एकमेव महिला नेत्या तथा आमच्या लाडक्या चित्रा वाघ काकू, आदिवासी महिला राष्ट्रपतींची तुम्हाला अॅलर्जी आहे का? संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती अन् त्यातल्या त्यात महिला राष्ट्रपती म्हणून त्यांच्या हस्ते केलं असतं ना! आणि बरं का चित्रा वाघ काकू, तुम्ही म्हणजे काही पूर्ण देश नाही हं…विचित्र”, असं पौळ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली असून नव्या इमारतीच्या उद्धाटनाला गैरहजर राहण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.