राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून सध्या राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. राज्यात ठिकठिकाणी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून संजय राऊतांनी केलेल्या विधानांची आठवण करून दिली आहे.
काय आहे वाद?
शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. “त्यांनी खोके घेतले म्हणून ते खोके देऊ करत आहेत”, अशी टीका सुप्रिया सुळेंनी अब्दुल सत्तार यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली. “इतकी भि***झाली असेल सुप्रिया सुळे, तर तिलाही देऊ”, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं.
या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभर रान उठवलेलं असताना त्यावर भाजपाकडून चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी ही प्रतिक्रिया दिली असून त्यासंदर्भातला व्हिडीओही त्यांनी ट्वीट केला आहे. “मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच. पण महिलांचा अपमान झाल्यावर निवडक नेत्यांविरोधात संताप कितपत योग्य? कंगना रनौत, स्वप्नाली पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही? महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच. सगळ्यांनीच भान ठेवा”, असं चित्रा वाघ आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.
“उत्तराला प्रत्युत्तर असतं”
दरम्यान, मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्येही त्यांनी संजय राऊतांच्या विधानांचा उल्लेख केला आहे. “प्रत्येक महिलेचा आदर-सन्मान व्हायला हवा. महिलांनीही बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. पुरुषांनी तर सन्मानच केला पाहिजे. पण मी महिला आहे म्हणून मी वाट्टेल ते बोलेन आणि त्याला जर उत्तर आलं तर महिलांची अस्मिता दुखावली गेली असं म्हणत असाल तर ते बरोबर नाही. दोघांनीही एकमेकांचा आदर-सन्मान ठेवायला हवा. उत्तराला प्रत्युत्तर असतं”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
“तुम्ही जे बोललात, त्यावर सत्तारांचं प्रत्युत्तर”
“मागच्या सरकारमध्येही अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाला म्हटलं होतं की ‘मुख्यमंत्र्यांची, मंत्र्यांची गरिमा तुम्ही ठेवायला हवी. भाजपा वाट्टेल तसं बोलते’. तसंच इथेही आहे. तुम्हीही मंत्र्यांची गरिमा ठेवायला हवी. ते मंत्री आहेत. त्यांच्या खात्याशी संबंधित काही असेल तर तुम्ही नक्की बोला. तुम्ही त्यांना जे बोललात, त्याला ते प्रत्युत्तर आलं आहे. अर्थात, या गोष्टीला माझं समर्थन नाही”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
“गेल्या अडीच वर्षांत काही का केलं नाही? संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत? एका अभिनेत्रीला हरामखोर म्हणणं हे योग्य आहे का? स्वप्ना पाटकर महाराष्ट्रातील मुलगी नव्हती का? त्यांच्यावर बोलल्यानंतर संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत?” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.