गेल्या ६ वर्षांपासून चंद्रपूरमध्ये लागू असलेली दारूबंदी अखेर राज्य सरकराने उठवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वाढत असलेली गुन्हेगारी आणि अवैध दारूविक्री या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यावरून आता विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. भाजपाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यासंदर्भात ट्वीट करून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी दारूबंदीसाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देत चित्रा वाघ यांन राज्य सरकारवर टीका केली आहे.
“भगिनींनो, कंबर कसून उभ्या राहा”
चित्रा वाघ यांनी ट्वीटरमधून राज्यातील महिला वर्गाला आवाहन केलं आहे. “दिवंगत नेते आर. आर. आबा यांनी उभी बाटली, आडवी बाटली करत आणलेली दारूबंदी या सरकारने शेवटी रिचवलीच. भगिनींनो, संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या राहा. परत चार हात करायची वेळ आणली या सरकारने आपल्यावर”, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
फडणवीस म्हणतात, “याचे दूरगामी परिणाम होतील!”
“चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील”, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. “राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
झा समितीच्या अहवालानंतर निर्णय
राज्य सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झा समितीच्या अहवालातील निष्कर्षांवर चर्चा करून त्यासंदर्भात चंद्रपूरमधली दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. गेल्या ६ वर्षांपासून म्हणजेच २०१५ सालापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू आहे. मात्र, ही दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी करणारी तब्बल अडीच लाख निवेदने सरकार दरबारी पाठवण्यात आली आहे. तर दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी ३० हजार निवेदनं आल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. यामध्ये दारूबंदी का उठवली जावी, या कारणांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
वाचा सविस्तर – चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!
अवैध दारु, गुन्हेगारीत वाढ ठरली कारणं!
दरम्यान, यासंदर्भात माध्यमांना माहिती देताना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना आपली भूमिका मांडली आहे. “दारूबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू सेवन आणि त्याची विक्री वाढली होती. तरुण वर्ग त्याच्या आहारी जाऊ लागला होता, तर महिला-लहान मुले या व्यवसायात उतरले होते. परिणामी जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ होऊ लागली होती. यासंदर्भात सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार दारुबंदी करण्यात आली आहे”, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.