गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकारण चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी एका सभेमध्ये सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यावरून भाजपानं काँग्रेसला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. तसेच, राहुल गांधी एकीकडे टीकेच्या केंद्रस्थानी असताना त्यांच्या यात्रेत सहभागी झालेले ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही भाजपाकडून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधींचं समर्थन केल्यानंतर आता भाजपाकडून त्यांच्यावरही हल्लाबोल करण्यात आला आहे. यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचाही संदर्भ भाजपाकडून देण्यात आला आहे.
काय म्हणाले तुषार गांधी?
तुषार गांधी शुक्रवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधींच्या विधानाला समर्थन दिलं होतं. “राहुल गांधींनी जे सत्य आहे ते सांगितलं आहे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. त्यांची माफी मागितली होती. इंग्रजांकडून पेन्शन घेतली होती. जर आपण सत्य सांगायला घाबरलो, तर आपण सत्याशी दगाबाजी करतो”, असं तुषार गांधी म्हणाले होते.
तसेच, “राहुल गांधींनी मांडलेलं मत अगदी योग्य आहे. सावरकर एकेकाळी क्रांतीकारी होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि पूर्ण आयुष्य इंग्रजांशी ते इमानदार राहिले. हे आपण सांगण्यात काहीच चुकीचं नाही. सत्य सांगायचं धाडस असायलाच हवं. ते कुणी सांगत नसतील, तर ते सत्याला घाबरतात हे स्पष्ट दिसतं. ज्यांना सत्य माहिती आहे, त्यांनी जर सत्य लपवलं, तर सत्याशी त्यांनी निष्ठा नाहीये हे कळून येतं”, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींची पाठराखण केली.
“राहुल गांधी सत्यच बोलले, एकेकाळी सावरकर…”; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली पाठराखण!
चित्रा वाघ यांचं खोचक ट्वीट!
दरम्यान, यासंदर्भात आलेलं वृत्त ट्वीट करत भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राहुल गांधी आणि तुषार गांधी या दोघांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. “आपापल्या पणजोबांच्या पुण्याईवर जगणारे, देशासाठी २ निरुपयोगी जीव… अहो रुपम् अहो ध्वनीम्…”, असं चित्रा वाघ ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत. यासोबत संबंधित वृत्ताचा स्क्रीनशॉट त्यांनी ट्वीट केला आहे.
दरम्यान, भाजपाकडून राहुल गांधींना लक्ष्य केलं जात असताना ठाकरे गटानंही त्यांच्या विधानांशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांनी या विधानावरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते, असं सूचक विधानही केलं आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर चालू असलेलं राजकारण नेमकं कुठल्या दिशेने जाणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.