राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या टीकेला भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. मेहबूब शेख यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेवर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला असून वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही अशा शब्दांत उत्तर दिलं आहे. चित्रा वाध यांनी ट्विट केलं असून सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले; आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू असल्याचा आरोप केला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे –
“वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकत आहेत. कारण मी पीडितांच्या पाठीशी उभी राहते म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू. मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,” असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी टीकेला उत्तर दिलं आहे.
वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत
कारण
मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणूनसत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू
मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या
वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 6, 2021
मेहबूब शेख यांनी निलेश लंके यांच्यावर केलेल्या टीकेवरुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता. “चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, असं ते म्हणाले होते. पारनेर तालुक्यातील कार्यक्रमात ते बोलत होते. लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे असंही यावेळी ते म्हणाले होते.
तसंच यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांना आधी तुमच्या नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा असा सल्ला देताना तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते अशी आठवण करुन दिली होती.