नांदेड लोकसभेसाठी डी. बी. पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर तब्बल ८ दिवसांनी पक्ष कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांची ‘मोट’ बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेदवारीचे प्रबळ दावेदार डॉ. धनाजीराव देशमुख समर्थकांसह दिल्लीत तळ ठोकून असल्याने संभ्रम कायम आहे.
नांदेड लोकसभेसाठी पहिल्याच यादीत भाजपने स्पध्रेत नसलेल्या डी. बी. पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला नाही. पर्यायाने भाजप पदाधिकाऱ्याना काँग्रेसच्या तुलनेत ८ दिवस जास्त काम करण्याची संधी मिळाली. परंतु ही संधी त्यांनी गमावली. डॉ. अजित गोपछडे, राम पाटील रातोळीकर, देवीदास राठोड, अॅड. चतन्य बापू देशमुख या इच्छुकांसह पक्षाचे प्रतिनिधी सुधाकर भोयर, माजी आमदार विजय गव्हाणे, उमेदवार डी. बी. पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी पक्षाचा मेळावा झाला. अनेकांनी आपल्या भाषणात निष्ठावंतांवर कसा अन्याय झाला व पक्षात उपऱ्यांना कशी संधी मिळते, याचा सूर आळवला. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी आम्ही पक्षाचे निष्ठावंत असल्याने पक्षाच्याच उमेदवाराचा निष्ठेने प्रचार करू, अशी हमी द्यायला ते विसरले नाहीत. उमेदवार डी. बी. पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीला पक्षांतराबद्दल कार्यकर्त्यांची जाहीर माफी मागितली. मी शरीराने तिकडे गेलो तरी मन इकडेच होते. एक-दीड वष्रे बाहेर राहिलो. आपले लोक जवळ नाहीत, हीच भावना माझ्यात होती. ध्यानी-मनी नसताना खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मला उमेदवारी दिल्याचे त्यांनी सांगितले. जय-पराजय जे होईल ते होईल. काँग्रेसतर्फे भाभी असो की दादा, मी राजकारणात नवीन नाही. या निवडणुकीत माझा विजय निश्चित होईल, असा दावा त्यांनी केला.
एकीकडे भाजपचा मेळावा होत असताना दुसरीकडे पक्षाचे इच्छुक डॉ. धनाजीराव देशमुख, भाजपचे जुने निष्ठावंत तुकाराम वारकड, मुखेडचे डॉ. माधव उंचेकर यांच्यासह ५-६जणांचे शिष्टमंडळ दिल्लीला गेले. शिष्टमंडळाने शुक्रवारी नागपूरला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. मात्र, तेथे डाळ न शिजल्याने भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खासदार राजीव प्रताप रुडी यांची भेट घेण्यास हे शिष्टमंडळ विमानाने दिल्लीला गेले.
नांदेडमध्ये भाजपतील संभ्रम कायम
नांदेड लोकसभेसाठी डी. बी. पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांची ‘मोट’ बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेदवारीचे प्रबळ दावेदार डॉ. धनाजीराव देशमुख समर्थकांसह दिल्लीत तळ ठोकून असल्याने संभ्रम कायम आहे.
First published on: 09-03-2014 at 01:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp confusion continue nanded