भाजप व काँग्रेस ही विकासाच्या गाडीची दोन चाके आहेत. केंद्रात भाजपचे, तर महाराष्ट्रात आघाडीचे सरकार राहिले तर विकासाचा समतोल साधला जाईल, असे प्रतिपादन आमदार दिलीपराव देशमुख यांनी केले.
लातूर महापालिकेच्या वतीने १३३.५५ कोटी खर्चाच्या रस्ते विकास प्रकल्पाचा प्रारंभ, तसेच बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात देशमुख बोलत होते. खासदार सुनील गायकवाड यांनी या वेळी मी केंद्रात प्रतिनिधी, तर अमित देशमुख राज्यात आहेत. लातूरच्या विकासासाठी निधी आणण्याची निकोप स्पर्धा करू. केंद्रात शहर विकासासाठीचे प्रलंबित प्रस्ताव असतील वा नव्याने प्रस्ताव दिल्यास त्याचा पाठपुरावा करू, असे सांगितले. हा धागा पकडून आमदार देशमुख म्हणाले की, खासदारांचे बोलणे खरे व्हावे. त्यांची व अमित देशमुखांची जोडी कायम राहावी. विधानसभा निवडणुकीत जनतेने राज्यात आघाडीचे सरकार पुन्हा निवडून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सध्या देशभर स्मार्ट सिटीचा बोलबाला आहे. देशातील १०० शहरे उभी राहतील तेव्हा राहतील. मात्र १०१ वे शहर लातूर स्वबळावर स्मार्ट सिटी बनते आहे. ३०० कोटी खर्चाची विकासाची कामे शहरात सुरू असून लातूर शहर फुलपाखराप्रमाणे फुलणार आहे. त्याला जपण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यमंत्री अमित देशमुख यांनी आचारसंहिता लागू होईल, हे लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांत भूमिपूजनांचा धुमधडाका सुरू आहे. सर्व कामांचे भूमिपूजन झाले आहे. आता नवे कोणते कार्यक्रम घ्यावेत, या विचारात आपण आहोत. आज, उद्या आचारसंहिता लागू होईल हे गृहीत धरून नियोजन केले होते. आता नव्याने नव्या कार्यक्रमांची आखणी करावी लागेल, असे म्हटले. लातूर शहराच्या रस्ते, वीज, पाणी, पथदिवे, गटारी, कचरा अशा विविध कामांसाठी ३०० कोटी मंजूर झाले आहेत व ही कामे लवकरच सुरू होत आहेत. विकासाचा वेग कायम राखण्यास जनतेने आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. महापौर स्मिता खानापुरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मोईज शेख, महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांचीही भाषणे झाली.
‘आता भरलेले भांडे’!
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यापूर्वी गदारोळ व्हायचा. बिनपशाची चर्चा असल्यामुळे रिकाम्या भांडय़ांचा आवाज व्हायचा. आता भरपूर पसे आले व भूमिपूजनही झाले. त्यामुळे या पुढच्या सभेत भांडे भरलेले असल्यामुळे आवाज होणार नसल्याचा उल्लेख आमदार देशमुख यांनी केला. लातूर शहराच्या आसपास चार एकर जागा उपलब्ध केल्यास शहरात आकाशवाणी केंद्र सुरू करता येईल. केवळ जागा नसल्यामुळे मंजूर झालेले आकाशवाणी केंद्र प्रतीक्षेत असल्याचे खासदार गायकवाड यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा