राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका सध्या सुरू आहेत. या निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचं काम राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. त्यामुळे सध्या बैठकांचा धडाका सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच आज मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन काय असेल?, तसेच लोकसभा निवडणुकीतील महायुतीला आलेल्या अपयशावर विचारमंथन करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत नेमकं काय ठरलं? विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात काय चर्चा झाली? यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधत सूचक भाष्य केलं. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशानंतर महाराष्ट्रातील भाजपामध्ये संघटनात्मक बदलाच्या चर्चांवरही आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. छोट्या-छोट्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काम करू’, असंही त्यांनी सांगितलं.
आशिष शेलार काय म्हणाले?
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा जो अर्थसंकल्प मांडला, तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसह सर्वांना समोर ठेवून मांडलेला आहे. पेट्रोल, डिझेलच्या दराच्या कपातीसह शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाचं वीज बिल माफ, माता भगिनींच्या खात्यावर पैसे, तीन सिंलेडर माफ, अशा अनेक योजनांचा महायुती सरकारचा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही १० जुलैपर्यंत २८८ विधानसभा मतदारसंघात सहकारी पक्षांना बरोबर घेऊन यासंदर्भातील भरिव कार्यक्रम घेऊन मतदारसंघात जाणार आहोत”, असं आशिष शेलार म्हणाले.
“महायुतीमधील सहकारी पक्षांच्या नेतृत्वाबरोबर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे बैठका घेतील. त्यांच्याबरोबर चर्चा करतील. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत सहकारी पक्षाला बरोबर घेऊन जात आहे. आज भारतीय जनता पक्षाची कोर कमिटीची बैठक पार पडली. भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. आम्ही विधानसभेची निवडणूक सहकारी पक्षांना बरोबर घेऊन लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत. यासंदर्भात आज सविस्तर चर्चा आम्ही केली”, असं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं.
लेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित असं यश मिळवता आलं नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीत संघटनात्मक काही बदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आशिष शेलार म्हणाले, भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनात्मक बदलाचा काहीही विषय नाही. भारतीय जनता पार्टी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याच घोषणेवर काम करत आहे. आम्ही महायुतीमधील सर्वांना बरोबर घेऊन विधानसभेची निवडणूक नक्कीच जिंकू, असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आम्ही संपादन करू, प्रत्येक मतदारांपर्यंत आम्ही पोहोचण्यासाठी काम करु, तसेच छोट्या-छोट्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा संपूर्ण रोडमॅप तयार आहे” , असंही आशिष शेलार यांनी सांगितलं.
इंडिया आघाडीवर टीका
“इंडिया आघाडीने खोटं बोलणं मान्य केलं असेल. कारण खोटे नरेटिव्ह पसरवत विरोधकांनी मते घेतली. आता जनता त्यांना विचारत आहे की, आमच्या खात्यावर साडेआठ हजार रुपये कधी येणार? खटाखट खटाखट एक लाख रुपये कधी येणार? मात्र, इंडिया आघाडी यापासून आता तोंड लपवत आहे. भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या सरकारने दिलेला अर्थसंकल्प हा जनतेला थेट मदत करणारा आहे”, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी सभा घेतल्या होत्या. त्यावरून शरद पवार यांनी म्हटलं की, लोकसभेसारख्या विधानसभेलाही मोदींनी सभा घ्याव्यात, असं म्हणत त्यांनी टोला लगावला होता. यावर आता आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार म्हणाले, “शरद पवार असो किंवा महाविकास आघाडी, यांच्या पोटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भिती भरलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे विधान ते करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभेची निवडणूक लढू आणि जिंकू”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं.