भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची बातमी देताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाने सोमय्या यांचा तोमय्या असा उल्लेख करून अपंग लोकांची चेष्टा केल्याचा आरोप भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केलाय. कुलकर्णी यांनी सामनाच्या बातमीत सोमय्या यांचा उल्लेख तोमय्या असा करण्याच्या घटनेचा निषेध केला. तसेच शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय.
राम कुलकर्णी म्हणाले, “आमचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला. यानंतर रविवारी (६ फेब्रुवारी) दैनिक सामनात सोमय्या ऐवजी तोमय्या असा उच्चार करून बातमी देण्यात आली. खरंतर दैनिक सामनाने अपंगत्व घेऊन जगणाऱ्या लोकांचा फार मोठा अपमान केला आहे.”
“…तर त्यांच्यापासून काय आदर्श घ्यावा?”
“वर्तमानपत्र हे समाजाला आदर्श देणारे असतात. पण अपंगाची अशी चेष्टा करणारे, अपंगाची खिल्ली उडवणारी बातमी ते छापत असतील, तर त्यांच्यापासून काय आदर्श घ्यावा?” असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा : “मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार”, किरीट सोमय्यांचं ट्वीट
“अपंग विभागाच्या आयुक्तांनी या प्रकाराची दखल घ्यावी आणि त्यांना नोटीस देऊन कारवाई करावी,” अशी मागणी देखील यावेळी राम कुलकर्णी यांनी केली.