मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला हुंकार सभा असं देखील शिवसेनेकडून संबोधलं जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष्य आहे. दरम्यान, या सभेवरून विरोधकांकडून टीका, टिप्पणी सुरू आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे टीका केली असून, भाजपाकडून ही उद्धव ठाकरेंच्या या सभेबद्दल टीकात्मक टिप्पणी करण्यात आली आहे.

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या सभेच्या पार्श्वभूमीवर टीका करताना म्हटले आहे की, “मुख्यमंत्र्याकडून गाजर – मतदारांचा आणि सामान्य शिवसैनिकांचा विश्वासघात करून मुख्यमंत्रीपद बळकावलेल्या उद्धव ठाकरे यांची अडीच वर्षांनंतरची दुसरी सभा संभाजीनगरला(औरंगाबाद) होणार आहे. या सभेत ते या शहराचे संभाजीनगर असे नामांतर करणार अशा आश्वासनाचे गाजर सैनिक दाखवू लागले आहेत. मुळात मुख्यमंत्र्यांना असा निर्णय घेण्याचं गेल्या अडीच वर्षात जमले नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पण त्याहून महत्वाचे म्हणजे, नामांतराचे गाजर दाखवून औरंगाबादच्या मुख्य समस्यांपासून नागरिकांचे लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळविण्याचा नेहमीचाच पोरखेळ पुन्हा ते खेळतील, अशी हवा तयार केली जात आहे.”

संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार असं म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे – उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संदीप देशपांडेंचं ट्वीट!

तसेच, “औरंगाबाद शहराला पाणीटंचाईची समस्या सतत भेडसावत आहे. केवळ बैठका घेऊन आणि कागदी आदेश देऊन हा प्रश्न सुटणार नाही. शहरातील रस्त्यांची दुर्दशा, औद्योगिक वसाहतीतील सुविधांचा अभाव, दहशत, खंडणीखोरी या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष वळवायचे आणि प्रत्यक्षात काहीच करायचे नाही ही ठाकरेंच्या कारभाराची तऱ्हा महाराष्ट्र अडीच वर्षांपासून अनुभवत आहे. त्यामुळे आजच्या सभेत केवळ गाजरे उधळण्यापलीकडे काहीही होणार नाही.” असंही केशव उपाध्येंनी म्हटलेलं आहे.

याचबरोबर, “ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतराची घोषणा करावी आणि त्याआधी पाणीटंचाईची समस्या तातडीने सोडवावी. उद्योगधंद्यांना सुरक्षिततेची हमी देऊन दादागिरी व दहशत माजविणाऱ्यांना वेसण घालून नागरिकांना सुखाने जगण्याचा मार्ग मोकळा करून दाखवावा. सभेत हात फैलावून घोषणाबाजी करून हे होणार नाही. त्यासाठी कृतीची गरज आहे आणि सरकारकडे नेमका त्याचाच अभाव आहे.” असं म्हणत उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

विरोधकांचं जे तोंड आहे ते तोंड नसून गटार आहे – शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर

दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “विरोधकांचं तोंड नसून गटार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावं, कसं बोलावं याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांविषयी तुमचा व्यक्तिगत द्वेष असू शकतो. त्यांनी जे काय मोठं काम करून ठेवलय, त्या विषयी. पण अशाप्रकारे तुमच्या तोंडातून जर भिजलेले फटाके फुटणार असतील, तर त्याची पर्वा आम्ही करत नाहीत.”

Story img Loader