शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परतिच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपाने निशाणा साधला आहे. “उध्दव ठाकरे हे आज मराठवाडा दौऱ्यावर शेतकऱ्यांना भेटायला जात आहेत. जरूर जावे पण काही प्रश्नांची उत्तरे ही द्या.” असे भाजपा प्रवक्ते केशव उपाधेय म्हणाले आहेत.
याशिवाय “चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात मागील वर्षी जुलै महिन्यात पूर परिस्थितीमुळे मरण पावलेल्या ८ कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. पुढे एक वर्ष उलटल्यानंतरही ही मदत मिळालीच नाही. तुमच्या पोकळ आश्वासनावर आपत्तीग्रस्तांनी आज प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार?, वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल, अशी घोषणा आपण गेल्या वर्षी २५ जुलै रोजी केली होती. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुढील वर्षभरात ही घोषणा कोणत्या बासनात बांधली?” असे प्रश्नही विचारले आहेत.
तर “अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याची गरज होती तेव्हा मुख्यमंत्री असूनही तुम्ही पुलावर अंथरलेल्या रेड कार्पेटवर उभे राहून मदतीची केवळ आश्वासने दिलीत. तेव्हा संकटात खचलेला शेतकरी पुढे वर्षभरात सावरावा यासाठी तुमच्या सरकारने काय केले?, शेतकऱ्यांना वरदान ठरलेली जलयुक्त शिवार ही शेततळी योजना बंद करून शेतकऱ्याचे पाणी तोडल्यावर तुम्ही ४ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्याची घोषणा केली होती. पुढच्या दीड वर्षात या घोषणेचे कागदी घोडे कोणत्या बासनात बांधले?” असा सवाल करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
याचबरोबर “जिरायत, बागायत जमिनीसाठी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी १० हजार रुपये देणार, फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५ हजार रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल. असे २३ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर केले होते. दोन वर्षांनंतरही अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालीच नाही. याची जबाबदारी घेऊन आज शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का?” असाही सवाल उद्धव ठाकरेंना उपाध्येंनी विचारला आहे.