भाजपाने शिवसेनेला चांगलाच झटका दिलाय. भाजपने शिवसेनेच्या माजी आमदारालाच गळ लावलाय आणि उमेदवारीही जाहीर केलीय. नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा कोविडनंतर १० एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पक्षप्रवेश होण्याआधीच त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे शिवसेनेसह महाविकासआघाडीसाठी हा झटका मानला जातोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसने देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलालाच संधी दिलीय. जगदीश अंतापूरकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आता त्यांना भाजपच्या वतीने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे निवडणूक रिंगणात असतील. त्यामुळे देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.

सुभाष साबणे म्हणाले, “मी आजही शिवसैनिक आहे. 4 ऑक्टोबरनंतर जो काही निर्णय आहे तो होईल. माझ्या शिवसैनिकाचा अपमान झाला. पोलिसांनी बुटासह तुडवलं. अशोक चव्हाण यांनी बॅनरवर माझ्या नेत्याचा कधीच फोटो छापला नव्हता. बॅनरवर महाविकासआघाडीच्या नेत्याचे फोटो राहावेत. माझ्या मतदारसंघात येताना महाविकासआघाडीचे नेते म्हणून आघाडीतील घटक पक्षाला सोबत घेऊन आलं पाहिजे. तुम्ही पक्षाचा कार्यक्रम राबवायला नको हीच आमची भूमिका होती. त्यामुळेच आम्ही काळे झेंडे दाखवत होतो. तर पोलिसांनी पकडून बुटासह कार्यकर्त्यांना मारलं.”

“… म्हणून मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला”

“देशाच्या पंतप्रधानाला देखील काळे झेंडे दाखवले जातात. बिलोली तालुक्यातील हा प्रकार घडला. मला वाईट वाटलं. म्हणून मी हा निर्णय घेतला. 1984 पासून मी शिवसैनिक आहे. ज्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार होती त्या दिवशी आम्ही विधानसभेत मोडतोड केली होती. त्यामुळे १ वर्षासाठी आम्ही निलंबित झालो. ते दिवसही आम्ही पाहिले,” असं मत सुभाष साबणे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं.

“आमचे मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांना पोलिसांकडून बुटांसह मारहाण”

शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांवर झालेल्या कारवाईवर सुभाष साबणे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “शिवसेनेच्या चांगल्या वाईट दिवसांमध्ये आम्ही शिवसेनेसोबत होतो. पण आज मुख्यमंत्री आमचे आहेत, तरी आमच्या कार्यकर्त्यांना बुटासह मारलं जातं. याचं वाईट वाटलं, खंत वाटली. माझ्या पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर माझी नाराजी नाही. फक्त नांदेड जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या अशोक चव्हाण यांना आमचा विरोध आहे.”

शिवसेनेच्या विनायक राऊतांनाच उद्धव ठाकरेंचा विसर! म्हणाले, मुख्यमंत्री अशोक चव्हाण…

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp declared assembly bypoll candidature to shivsena ex mla before joining party pbs