स्थायी सभापतीच्या निवडणुकीतील कटू अनुभवांना तिलांजली देत भाजपने महापौरपदासाठी गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन महापौरपद आपल्याला मिळावे अशी मागणी केली. साधारणत: दीड तास सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत भाजपने या मुद्दय़ावर शिवसेनेशीही बोलणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. साधारणत: अडीच वर्षांपासून महापालिकेत मनसेशी सत्तासंगत करणाऱ्या भाजपला अलीकडेच स्थायी सभापतीच्या निवडणुकीत ऐन वेळी कात्रजचा घाट दाखविला गेला. सत्ताधारी मनसेच्या उमेदवाराने भाजप उमेदवारास पराभूत केल्यानंतर उभयतांमध्ये बिनसले होते. या पराभवाची परतफेड महापौरपदाच्या निवडणुकीत केली जाईल, असा इशारा देणाऱ्या भाजपने आता मनसेसमोर हे पद आपणास मिळावे म्हणून शरणागती पत्करली आहे. गुरुवारी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.
महापालिकेत कोणत्याही एका पक्षाचे बहुमत नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समान विचारांच्या पक्षांना एकमेकांशी मदत लागणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव राज ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे सावजी यांनी सांगितले. स्थायीच्या निवडणुकीत ऐन वेळी भाजपचा घात झाला.
पुढील काळात असे घडणार नाही अशी अपेक्षा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या मुद्दय़ावर भाजपचे वरिष्ठ नेते राज यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सावजी यांनी सांगितले.
मनसे व भाजपमधील वाद लक्षात घेऊन शिवसेनेने संख्याबळाचे गणित जुळविण्याची चाचपणी चालविली आहे. परंतु, आता भाजपने सहकार्यासाठी शिवसेनेशी चर्चा केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
महापौरपदासाठी भाजपचे राज ठाकरे यांना साकडे
स्थायी सभापतीच्या निवडणुकीतील कटू अनुभवांना तिलांजली देत भाजपने महापौरपदासाठी गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन महापौरपद आपल्याला मिळावे अशी मागणी केली.
First published on: 29-08-2014 at 12:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp demand mayor post from chief raj thackeray