निवडणूक आयोग लवकरच देशातल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वेगवेगळे पक्ष त्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या याद्या जाहीर करू लागले आहेत. गेल्या आठवड्यात भारतीय जनता पार्टीने त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. याद्वारे भाजपाने १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यापाठोपाठ भाजपाने आता त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपाने पहिल्या यादीत महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचं नाव जाहीर केलं नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला भाजपाच्या उमेदवारांची नावं जाणून घेण्याची उत्सुकता होती. अशातच भाजपाने आज त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार हिना गावित यांना नंदुरबार, सुभाष भामरे-धुळे, स्मिता वाघ – जळगाव, रक्षा खडसे – रावेर, अनुप धोत्रे – अकोला, रामदास तडस – वर्धा, नितीन गडकरी – नागपूर, सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, प्रतापराव चिखलीकर – नांदेड, रावसाहेब दानवे – जालना, भारती पवार – दिंडोरी, कपिल पाटील – भिवंडी, पियूष गोयल – उत्तर मुंबई, मिहिर कोटेचा – मुंबई उत्तर पूर्व, मुरलीधर मोहोळ – पुणे, सुजय विखे पाटील – अहमदनगर, पंकजा मुंडे – बीड, सुधाकर श्रृंगारे – लातूर, रणजीत सिंह नाईक निंबाळकर – माढा आणि संजयकाका पाटील यांना सांगलीतून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.
दरम्यान, भाजपाने चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. भाजपाने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियूष गोयल यांना तर मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे, तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रातील २० उमेदवारांसह भाजपाने देशभरातील इतर राज्यांमधील ५२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये कर्नाटकमधील २० उमेदवार, मध्यप्रदेशातले पाच, त्रिपुरातला एक, दादरा आणि नगर हवेलीमधील एक आणि तेलंगणमधले ६ उमेदवार जाहीर केले आहेत.
हे ही वाचा >> लोकसभेसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर! नितीन गडकरी, पंकजा मुंडेंसह २० जणांची नावं जाहीर
भाजपाने पुण्याचा प्रश्न मिटवला
पुणे लोकसभेसाठी भाजपात मोठी स्पर्धा होती. या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपातील पाच ते सहा मोठे नेते प्रयत्न करत होते. यापैकी मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर भाजपाने शिक्कामोर्तब केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर, जगदीश मुळीक, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यासह इतर काही नेते पुण्यातून लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, भाजपा पक्षश्रेष्ठींनी मोहोळ यांना संधी दिली आहे.