सकाळी ९ वाजता बोलणारे अलीकडच्या काळात कमी बोलू लागले आहेत असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोपाच्या भाषणात फडणवीस यांनी यापूर्वीच्या ठाकरे सरकारवर टीका करतानाच नव्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला. तसंच कार्यकर्त्यांना पदांची अपेक्षा ठेवू नका असा सल्ला दिला.

संजय राऊतांना टोला

सकाळी ९ वाजता बोलणारे अलीकडे कमी बोलू लागले आहेत, कारण काही माहिती नाही असा अप्रत्यक्ष टोला फडणवीसांनी संजय राऊत यांना लगावला. यावर कार्यकर्त्यांकडून ‘पवारांचा पोपट’, ‘विचार संपले’, ‘पेट्रोल संपलं अशी शेरेबाजी करण्यात आली. त्यावर फडणवीस म्हणाले की, “तुम्ही त्यांना कृपया शिव्या देऊ नका, उलट आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जितका वाटा आहे, तितका इतर कोणाचाच नाही. महाराष्ट्राच्या जनतेला, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी वैताग आणला. त्यामुळे हा लाऊडस्पीकर बंद करायचा असेल तर सत्तापरिवर्तनाशिवाय पर्याय नाही असा निर्णय त्यांनी घेतला”.

भाजप सत्तापिपासू नसल्याने शिंदेंना मुख्यमंत्रीपद; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

“पदांची अपेक्षा ठेवू नका”

“विधानपरिषदेतील १२ आमदारांसाठी पात्र असणारे २०० लोक तर याच सभागृहात आहेत. १२०० लोक मला बायोडेटा देऊन गेले आहेत. नियमांचं पालन करुन सर्व काही केलं जाईल. त्यातील काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील. आपल्यातील अनेकांना माझ्यामध्ये काय कमतरता होती असं वाटू शकतं. प्रत्येकजण काम करत असल्याने, संघर्ष करत असल्याने तसं वाटणं साहजिक आहे. पण एकाच वेळी सर्वांना सगळ्या गोष्टी देता येत नाहीत. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की, संघर्षाच्या काळात आपण एकत्र होतो. पण आता संघर्ष न करता समाजासाठी काम करणंही गरजेचं आहे. कोणी नाराज होण्याचं कारण नाही”.

मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रीपद!; चंद्रकांत पाटील यांचे विधान

ते पुढे म्हणाले की “आपल्यापैकी कोणीही फक्त सत्ता मिळवण्यासाठी भाजपात आलेलं नाही. जेव्हा विचार संपतो तेव्हा पक्ष संपतो. जे पक्ष विचारांवर चालले तेच टिकले, ज्यांनी विचार सोडला आणि केवळ सत्तेसाठी गेले ते संपले. ज्यावेळी पक्षात एकाधिकारशाही, घराणेशाही आली तेव्हा ते संपले”.

शिवसेनेबरोबर सत्तेत असल्याने त्यांनाही काही वाटा द्यावा लागेल आणि पदांना मर्यादा आहेत. त्यामुळे फार काही अपेक्षा न ठेवता त्यागाच्या भूमिकेतून काम करत राहण्याचा कानमंत्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

उपमुख्यमंत्रीपद हा सन्मानच

“भाजपाने सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्य जनतेला मोकळा श्वास घेता यावा, यासाठी सत्ता परिवर्तन केलं. सत्ता हे आमचे ध्येय नसून परिवर्तनाचे साधन आहे. मला सत्तेचा मोह नसल्याने सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला. पण पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. त्यांचा निर्णय हा माझ्यासाठी सन्मानच असून त्यांनी घरी पाठविले असते, तरी गेलो असतो,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

Story img Loader