आज संपूर्ण देशभरात ३१ डिसेंबरच्या स्वागताची तयारी सुरु असून बीडमध्ये याच पार्श्वभूमीवर व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसंग्रामच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांनी २०१५ मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली तेव्हा दिवंगत विनायक मेटे यांच्यासह झालेल्या संवादाची आठवण करुन दिली. त्यावेळी विनायक मेटे यांनी फडणवीसांनी ३१ डिसेंबरला लोकांनी दारुऐवजी मसाला दूध प्यावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं.
“२०१५ साली मेटेंनी व्यसनमुक्तीची संकल्पना मांडली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. त्यांनी मला निमंत्रित केलं होतं. व्यसनमुक्तीसाठी मोठी रॅली आणि कार्यक्रम करायचा असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं. अलीकडे ३१ डिसेंबरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दारु आणि इतर व्यसनं यांची पार्टी केली जात असून, याचा तरुण पिढीवर विपरित परिणाम होत आहे. दारु पिऊन लोक भांडणं करतात, अपघात होतात. चरस, गांजाचं सेवन करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना आपल्याला व्यसनापासून दूर करायचं आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून रात्री लोकांनी नववर्षाचं स्वागत करताना दारु नाही तर मसाला दूध प्यायलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले होते,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.
“मी त्यांना ही चांगली संकल्पना असल्याचं सांगितलं होतं. तुमचा हा उपक्रम हळूहळू महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही पोहोचेल अशी आशा मी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी तुम्ही उद्घाटनाला आलं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी माझा दुसरा कार्यक्रम ठरला होता. मी त्यांना मी तर व्यसनमुक्तच आहे, मला कोणतंच व्यसन नाही सांगत व्यसनमुक्तीच्या रॅलीत येऊन काय करु असं विचारलं होतं. त्यावर त्यांनी मला लोकांना दाखवायचं आहे की व्यसन नाही केलं तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणून बोलवत आहे म्हटलं होतं,” अशी आठवण फडणवीसांनी सांगितली.
“दुर्दैवाने मी त्यावर्षी आलो नाही. त्यानंतर एक वर्षी यायचं ठरलं होतं पण ते रद्द झालं. आज या कार्यक्रमाला आलो आहे, पण दुर्दैवाने विनायक मेटे नाहीत,” अशी खंत फडणवीसांनी व्यक्त केली. वहिनींनी आपण हा कार्यक्रम पुढे नेणार असल्याचं सांगितल्यावर मला बरं वाटलं. काही झालं तरी मी या कार्यक्रमाला येणार असं त्यांना सांगितलं होतं असं फडणवीस म्हणाले.