दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापनेवेळी राजभवनावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सत्तास्थापनेची घेतलेली शपथ आणि त्यांचे राज्यपालांसमोर हस्तांदोलन करतानाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. हो सरकार ८० तासांत पडलं आणि अजित पवार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये अधून-मधून कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतो. महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारच्या धोरणांवरून त्यांनी अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारी पक्षाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात या पत्रकार परिषदेत माहिती देतानाच देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडलं.
“आम्हाला चर्चा करण्यात रस”
बऱ्याच काळानंतर मोठं अधिवेशन मिळालं असल्याचा उल्लेख यावेळी फडणवीसांनी केला. “आम्हाला चर्चा करण्यात रस आहे. अनेक दिवसांनंतर १७-१८ दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळालं आहे. राज्याच्या जनतेचे प्रश्न तिथे मांडले गेले पाहिजेत. पण चर्चा झाली पाहिजे ही सरकारी पक्षाचीही जबाबदारी आहे. नाहीतर ओबीसीच्या मुद्द्यावर बोललं, तर १२ लोकांना निलंबित केलं. विद्यापीठाचं विधेयक विरोधकांची मुस्कटदाबी करून काढण्यात आलं. लोकशाही पायदळी तुडवली. असा व्यवहार हे सरकार करणार असेल, तर त्याचा आम्हालाही विचार करावा लागेल”, असं फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांवर अस्मानीनंतर सुलतानी संकट!
यावेळी बोलताना फडणवीसांनी राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाल्याचं सांगितलं. “राज्यातला शेतकरी हवालदील झाला आहे. विजेचे कनेक्शन कापण्याचं काम सरकारने सुरू केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिलेली नाही. मागच्याच्या मागच्या अधिवेशनात त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं, वीज कनेक्शन कापणं बंद, शेवटच्या दिवशी सांगितलं सुरू. मागच्या अधिवेशनात ते म्हणाले, तेव्हा मी चुकीचं बोललो होतो, आता ठामपणे सांगतोय की वीज कनेक्शन कापणार नाही. पण आता स्पर्धा लागल्यासारखे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत. गेली दोन वर्ष आस्मानी संकट आणि आता सुलतानी संकट शेतकऱ्याला झेलावं लागत आहे. यावर सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत”, असं फडणवीस म्हणाले.
“तुमच्यातले काही दाऊदच्या घरची धुणीभांडी…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!
“ऊर्जामंत्री जशी वक्तव्य करतायत, ते पाहून आपण लोकशाहीत आहोत की तानाशाहीत असा प्रश्न पडतोय. सरकारची ही असंवेदनशील आणि अहंकारी वृत्ती आहे. तो अहंकार आम्ही तोडायला लावू”, अशा शब्दांत त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावरही निशाणा साधला.