केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा विशेष चर्चेत आला आहे. सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये अमित शाह सहकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावरून अेक तर्क-वितर्क लढवले जात असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाह आज शिर्डी येथे साई दर्शनाने आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार होते. मात्र, त्यांच्या आगमनाच्या वेळीच साई मंदिरात आरती सुरू असल्यामुळे दर्शनाची रांग बंद ठेवण्यात येते. त्यामुळे अमित शाह थेट सहकार परिषदेच्या ठिकाणी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तिथे सहकार परिषदेत सहकार क्षेत्राविषयी चर्चा होणार असून त्यानंतर निघताना ते साई दर्शनासाठी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
“सहकाराला १०० वर्षांचा इतिहास, पण…”
दरम्यान, या दौऱ्यावर तर्क लावले जात असताना फडणवीसांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “देशात सहकार मंत्रालय पहिल्यांदा तयार झालं. १०० वर्षांपेक्षा जास्त सहकारचा इतिहास आहे. पण देशात सहकारासाठी वेगळं मंत्रालय नव्हतं. पहिल्यांदा मोदींनी सहकार मंत्रालय केलं”, असं ते म्हणाले.
“राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्याचा आदेश”
“सहकारातील अडचणी दूर करण्यासाठी अमित शाहांचा दौरा”
“ज्यांना सहकारातला अनुभव आहे, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या खात्याचं मंत्री केलं आहे. आज सहकाराची भूमी असलेल्या महाराष्ट्रात सहकार परिषद घेऊन सहकारातील अडचणी दूर करण्यासाठी अमित शाह इथे येत आहेत”, असं फडणवीस म्हणाले. “साई बाबांना खरंतर काही मागायचंच नसतं. बाबांना सगळं माहिती असतं. जे योग्य आहे तेच बाबा करतील”, असं देखील ते यावेळी म्हणाले.