देश पातळीवर राष्ट्रपुरुषांची सुरू असलेली बदनामी भाजप-काँग्रेसने त्वरित थांबवावी, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. गोरेगाव येथे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात ठाकरे बोलताना राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनाही खडसावलं. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. मंत्रालयात महात्मा फुलेंच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“राज ठाकरे काय बोलले ते मी ऐकलं नाही. माझी प्रतिक्रिया त्यांच्या बोलण्यावर नाही. पण ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा देश घडवण्यासाठी काम केलं आहे त्यांच्याबद्दल कोणीही खालच्या स्तरावर बोलू नये,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं.
“शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आणि भारताचं दैवत”
“शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आणि भारताचं दैवत, आदर्श आहेत. त्यासंबंधी कोणताही वाद होऊ शकत नाही. काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून, कोणीही करत असेल तर ते योग्य नाही. महाराजांचा सन्मान कोणीही कमी करु शकत नाही,” असंही ते म्हणाले.
महापुरुषांची बदनामी करून काय मिळवणार?; राज ठाकरे यांनी भाजप-काँग्रेसला ठणकावले
“महाराष्ट्र आणि कर्नाटकने न्यायालयावर विश्वास ठेवावा”
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर ते म्हणाले की “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी बैठक घेतली. या बैठकीत आपले वकील उपस्थित होते. आपण त्यासंबंधी योग्य समन्वय साधत आहोत. हा प्रश्न न्यायालयाच्या अख्त्यारित आहे. त्यावर न्यायालय निर्णय देणार असल्याने त्यावर वाद निर्माण करणं योग्य नाही. हे दोन्ही राज्यांसाठी योग्य नाही. दोघांनीही न्यायालयावर विश्वास ठेवलं पाहिजे”.
राज ठाकरे काय म्हणाले?
गुजराती- मारवाडींचा पुळका घेणाऱ्या राज्यपालांनी आधी ही मंडळी व्यवसायासाठी राज्यात का आली याचा विचार करावा, केवळ राज्यपाल आहात म्हणून मान राखतोय.. राज्यात शिव्यांची कमतरता नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. राज्यातून उद्योग जात असून केंद्र सरकारनेही केवळ गुजरात गुजरात न करता अन्य राज्यांकडेही समान वृत्तीने पाहावे. सगळय़ाच राज्यांचा विकास झाला पाहिजे; पण देशातील कलुषित वातावरणामुळे पाच लाख उद्योजक देशाबाहेर गेल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी सावरकरांची बदनामी करीत आहेत. मात्र कारागृहातून सुटून पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठीची सावरकरांची ती रणनीती होती. चांगल्या कामासाठी खोटे बोलले तरी त्यात गैर नाही हीच कृष्णनीती असल्याचा दावा करीत देशातील महापुरुषांची बदनामी थांबविण्याचे आवाहन त्यांनी केले.