वीज बिलाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यात आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी हे असं बोलायला वेगळी हिंमत लागते असा टोला लगावला. मंत्रालयात महात्मा फुलेंच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे ?

बुलढाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. यामध्ये त्यांनी वीज बिल माफ करण्याचा मुद्दा मांडला होता. “सावकारी पद्धतीने वीज बिल वसूल केले जात आहे. काय बोलत होते? मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शेतकरी संवाद मेळाव्यात केली होती.

देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

“वीज बिल माफ करु असं मी कधीच म्हटलं नव्हतं. मध्यप्रदेश सरकारने करोना काळापुरतं वीज बिल स्थगित आणि माफ केलं होतं. महाराष्ट्रातही त्याची अमलबजावणी व्हावी असं मी म्हणालो होतो. पण तेव्हा महाविकास आघाडी सरकार इतकं निर्दयी सरकार होतं की शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची सूट त्यांनी दिली नाही. यांना बोलण्याचा अधिकारच नाही,” अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

“यांनी कनेक्शन कट केले होते. हे कोणत्या तोंडाने बोलत आहेत. आम्ही जे बोलतो ते करतो. रब्बीचा हंगाम सुरु असल्याने कनेक्शन तोडू नये असं सांगितलं आहे. इतकंच नाही तर पहिल्यांदाच कंपनीने पत्रक काढून अधिकाऱ्यांना थकबाकी मागायची नाही आणि कनेक्शन तोडायचं नाही असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बोलणाऱ्यांनी जनाचीही आणि मनाचीही ठेवली पाहिजे,” असं प्रत्युत्तर यावेळी त्यांनी दिलं.

Photos : “तुम्ही शिव्या खाऊन जगता ते ठिक, पण…”; मोदींवर निशाण,फडणवीसांचा व्हिडीओ ऐकवला; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाची वक्तव्यं

“हे सत्तेत नसतात तेव्हा वीमा कंपन्यांवर मोर्चा काढतात, काचा फोडतात. आज हिशोब काढला तर यांच्या सत्तेत वीमा कंपनीला सर्वात जास्त फायदा झाला आहे. एका वर्षी अडीच-तीन हजार कोटी विमान कंपन्यांना आपण देऊन टाकले. आपल्या शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाहीत. हे लोक सत्तेबाहेर वेगळं आणि सत्तेत वेगळं वागत असल्याचं उघड झालं आहे,” अशी टीका त्यांनी केली.

पुढे ते म्हणाले की “यापूर्वी मोठी भाषणं करायचे आणि बोलायचे. तेव्हा सत्तेत नव्हते किंवा मुख्यमंत्री, मंत्री नव्हते. तेव्हा कोणीही विचारायचं नाही. आता लोक विचारत आहेत की, काय केलं ते दाखवा. पण स्वत: काही करायचं नाही आणि बाहेर पडल्यावर प्रश्न विचारायचे यालाही एक वेगळी हिंमत लागते”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadnavis on shivsena uddhav thackeray farmers electricity bill sgy