राज्यात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. दोन्ही नेते लवकरच फोनवरुन चर्चा करणार असून यानंतर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संभाव्य युतीवर टीका केली असून आम्ही त्यांचा सामना करु असं म्हटलं आहे. ते पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
‘उद्धव ठाकरेंशी युतीबाबत फोनवरून चर्चा?’; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “माध्यमांनी लग्न…”
कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी फडणवीस गुरुवारी संध्याकाळी पंढरपुरात दाखल झाले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांच्या राजकारणावर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे राजकीय युती करणार असल्याच्या हालचाली होत असल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया नोंदवली. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर जेव्हा खरोखर एकत्र येतील तेव्हा बघू असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
“एकमेकाला पाण्यात पाहणारे, विरोध करणारे, ज्यांचे विचार कधीच पटले नाहीत, विचारधारा एक नाही ते आमच्याविरोधात एकत्र येत असतात. ते कितीही वेळा एकत्र आले तरी त्यांचा समर्थ मुकाबला करण्यास भाजपा नेहमीच खंबीर आहे. भाजपा यापुढेही त्याच ताकदीने मुकाबला करणार,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांचा समाचार घेतला.
शिवसेनेला प्रत्युत्तर
“पंतप्रधानांनी २ लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले असून, त्यातील काही सुरु झाले आहेत. निवडणुका आल्यावर ढोंगं करणारे, सोंगं घेणारे आम्ही नाही. आम्ही पाचही वर्षं काम करणारे आहेत,” असं उत्तर त्यांनी शिवसेनेच्या टीकेला दिलं. महाराष्ट्रासाठी प्रकल्प मंजूर होत असल्याने निवडणुका लवकरत जाहीर होतील असं शिवसेनेने म्हटलं आहे.