महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असे म्हटले. त्यानंतर उबाठा आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. काल (दि. २० एप्रिल) उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांना ‘कोडगा माणूस’ असे म्हटले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट टाकून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट टाकली. यात त्यांनी लिहिले, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू. पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करु शकत नाही.”

“हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत. दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करुन कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना? महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रीप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका.
जशास तसे उत्तर दिले जाईल!”, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले.

“फडणवीस म्हणाले होते, ते आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि स्वत:…”, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा!

वादाला सुरुवात कशी झाली?

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करण्याचे वचन दिले होते, असे उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये सांगितले. “देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की ते माझा मुलगा आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि ते स्वत: दिल्लीत जातील. पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले”, असा दावा उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये केला होता.

‘हो, मी आदित्यला…’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीस स्पष्टच म्हणाले, “मला वेड…”

देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरेंच्या दाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी काल (दि. २० एप्रिल) अमरावती येथील सभेतून उत्तर दिले. आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा शब्द मी दिला असेल तर मला तरी वेड लागले आहे किंवा हे विधान करताना त्यांना तरी वेड लागले आहे, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. “एकदा खोटं बोललं की वारंवार खोटं बोलायला लागतं. मग कुठेतरी पोल-खोल होते. आज उद्धव ठाकरेंची पोलखोल झाली. माझे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. आज ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीमध्ये जाईन. त्यांना वेड लागले असेल. पण मला तर वेड लागलेले नाही”, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadnavis reaction on uddhav thackeray speech says we cannot respect them kvg